दुबार पेरणीचे संकट टळले!
By Admin | Updated: July 14, 2017 18:09 IST2017-07-14T18:09:49+5:302017-07-14T18:09:49+5:30
जूनच्या पावसावर विसंबून पेरणी केलेल्या, परंतु तीन आठवडे पाठ फिरविलेल्या पावसाच्या दमदार पुनरागमनाने जिल्ह्यावर कोसळलेले दुबार पेरणीचे संकट टळले

दुबार पेरणीचे संकट टळले!
नाशिक : जूनच्या पावसावर विसंबून पेरणी केलेल्या, परंतु तीन आठवडे पाठ फिरविलेल्या पावसाच्या दमदार पुनरागमनाने जिल्ह्यावर कोसळलेले दुबार पेरणीचे संकट टळले असून, शुक्रवारी मध्यरात्रीपासून संततधार लावलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने जिल्ह्यात गत वर्षाप्रमाणे सरासरी ४० टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७५७ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून, सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात करण्यात आली आहे. त्याखालोखाल त्र्यंबकेश्वर येथे १२५, सुरगाण्याला १११ व पेठला ८८ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नाशिक शहरातही ४८ मिलीमीटर पाऊस झाला. शुक्रवारच्या पावसाने जिल्ह्यातील नांदगाव वगळता सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्यामुळे पेरणीनंतर पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, विशेष करून पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांतील भाताची आवणी अडचणीत सापडली होती. जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने त्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी भाताची आवणी केली, परंतु रोपे तयार झाल्यानंतर भात लावणीसाठी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली. अशीच परिस्थिती मका, सोयाबीन, बाजरीची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची झाली होती. जूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला प्राधान्य दिले होते. पेरणीनंतर पाण्याची गरज असताना जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली होती. त्यामुळे गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यातच पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाची सरासरी ५६७१ मिलीमीटर इतकी असून, गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात २६४७ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. जून व जुलैचा एकूण पाऊस पाहता जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यात ४० टक्के इतका पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात कमी पाऊस झाल्यामुळे व्यक्त होणारी चिंता दूर झाली आहे.