डॉबरमॅन ‘गुगल’ने लावला काही तासांत घरफोडीचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 18:14 IST2020-09-12T18:14:05+5:302020-09-12T18:14:43+5:30
बनावट किल्लीचा वापर करत घराचा मुख्य दरवाजा उघडून खोडनेगरमधील अजमुल्ला अन्सारी यांच्या घरातून ८० हजाराची रोकड व एक तोळे वजनाचे दागिणे असा एकूण ९० हजारांचा ऐवज काही दिवसांपुर्वीच चोरट्याने लुटून पोबारा केला होता.

डॉबरमॅन ‘गुगल’ने लावला काही तासांत घरफोडीचा छडा
नाशिक : घरफोड्या करणारे गुन्हेगार अनेकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होतात किंवा त्यांना बेड्या ठोकण्यासाठी गुन्हे शोध पथक व गुन्हे शाखेला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते; मात्र शहर पोलीस श्वान पथकातील अत्यंत चलाख अन् बुध्दीवान अशा गुगल या प्रशिक्षित श्वानाने काही तासांत एका घरफोडीच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराचा माग काढून दिल्याने पोलिसांना तत्काळ त्यास बेड्या ठोकता आल्या.
बनावट किल्लीचा वापर करत घराचा मुख्य दरवाजा उघडून खोडनेगरमधील अजमुल्ला अन्सारी यांच्या घरातून ८० हजाराची रोकड व एक तोळे वजनाचे दागिणे असा एकूण ९० हजारांचा ऐवज काही दिवसांपुर्वीच चोरट्याने लुटून पोबारा केला होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी श्वान पथकातील डॉबरमॅन प्रजातीच्या ‘गुगल’ श्वानाला पाचारण करण्यात आले. श्वान हॅन्डलर पोलीस शिपाई गणेश कोंडे, अरुण चव्हाण, चालक सुधीर देसाई हे तत्काल घटनास्थळी पोहचले. कोंडे यांनी गुगलला त्या घरात फिरविले. यावेळी चोरट्याने फेकून दिलेला दागिण्यांचा रिकामा बॉक्स, पर्स आदि वस्तू गुगलने यावेळी हुंगल्या आणि तत्काळ त्या वासानुसार त्याने कोंडे यांना घेऊन माग दाखविण्यास सुरुवात केली. परिसरात गुगल धावत असताना औत्सुक्याचा विषय ठरला. धावत-धावत गुगल थेट चक्क एका महिलेजवळ जाऊन थांबला. यावेळी त्याच्यामागे असलेल्या पोलिसांनी तत्काळ त्या महिलेला तेथेच थांबण्यास सांगितले. महिला पोलिसांच्या मदतीने त्या संशयित महिलेची चौकशी करण्यात आली. यावेळी तिने मुज्जफर शेख नावाचा व्यक्ती अन्सारी यांच्या घरी आल्याची माहिती दिली. या माहितीवरुन पोलिसांनी सातपूरजवळील सोमेश्वर कॉलनीमधून संशयित गुन्हेगार मुज्जफरच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून पोलिसांनी रोकड व दागिने असा ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
...ये जोडी हैं नंबर-१
शहर पोलीस आयुक्तालयातील श्वान पथकात असलेला तीन वर्षे वयाचा डॉबरमॅन गुगल, पाच वर्षे वयाचा जर्मन शेफर्ड मॅक्स या दोन्ही श्वानांची जोडी नंबर-१म्हणून ओळखली जाते. यापुर्वीही या दोन्ही श्वानांच्या नावावर विविध गुन्ह्यांचा छडा लावल्याची नोंद आहे. गुन्हेगारांचा माग काढत्यात हे श्वान अत्यंत तरबेज आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या कामगिरीमुळेच मॅक्सने सुवर्ण तर गुगलने कांस्यपदक मिळविले होते. मॅक्स हा अंमली पदार्थ शोधक म्हणून ओळखला जातो आणि गुगल हा अन्यप्रकारच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी शहर पोलीस दलात प्रसिध्द आहे.