दैवीशक्तीचा दावा : भोंदूबाबाकडुन युवतीची फसवणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 19:18 IST2018-08-08T19:17:06+5:302018-08-08T19:18:31+5:30
भरवस येथील शिवाबाबा ऊर्फनवनाथ संजय क्षीरसागर या भोंदूबाबाने जवळच असलेल्या गावातील महिलेस त्याच्या अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून तिच्या १८ वर्षीय मुलीशी विवाह करत फसवणूक केल्या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैवीशक्तीचा दावा : भोंदूबाबाकडुन युवतीची फसवणुक
लासलगाव : भरवस येथील शिवाबाबा ऊर्फनवनाथ संजय क्षीरसागर या भोंदूबाबाने जवळच असलेल्या गावातील महिलेस त्याच्या अंगात दैवीशक्ती असल्याचे भासवून तिच्या १८ वर्षीय मुलीशी विवाह करत फसवणूक केल्या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर भोंदूबाबाने या महिलेशी संधान साधत तिला तिची मुलगी देवाला द्यावी लागेल असा संकल्प करून घेतला. सदर संकल्प पूर्ण न केल्यास देवाचा प्रकोप होईल व परिवारावर संकटे येतील अशी भीती दाखवून त्याने त्या महिलेच्या अठरावर्षीय मुलीसोबत लग्नही केले. संशयित भोंदूबाबा नवनाथ संजय क्षीरसागर याने पीडित युवती व तिच्या आईस वेळोवेळी तिच्या राहत्या घरी भरवस येथील नागेश्वर मंदिर तसेच नाशिकला गोदा घाटावर नेऊन मला स्वप्नात शिवलिंगाचा दृष्टांत झाला आहे, असे सांगून अंगात दैवीशक्ती असल्याचे भासविले. शिवाय महिलेकडून संकल्प करून घेत फसवणूक केली.
या प्रकरणी सदर महिलेने लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिनकर मुंडे अधिक तपास करत आहेत.