मनसेच्या कार्यालयातच खळ्ळखटॅक; नाशिक कार्यालयात नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 15:32 IST2022-03-24T15:32:32+5:302022-03-24T15:32:58+5:30
या प्रकरणाची तक्रार संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला कामावरून कमी करून नाशिकरोडच्या पदाधिकाऱ्याला समज दिली

मनसेच्या कार्यालयातच खळ्ळखटॅक; नाशिक कार्यालयात नेमकं काय घडलं?
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे ओळखली जाते. एखादे आंदोलन केले मग त्यात खळ्ळखटॅक ठरलेला असतो. मात्र मनसेच्या कार्यालयात खळ्ळखटॅक झाल्याची बातमी समोर आली आहे. मनसेच्या कार्यालयात आलेल्या नाशिकरोडच्या एका पदाधिकाऱ्याने कार्यालयीन कर्मचाऱ्याला खुर्ची मागितल्याने झालेल्या वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. मनसेच्या कार्यालयातच खळ्ळखटॅक झाल्याने दिवसभर त्याचीच चर्चा रंगली होती. अखेरीस वरिष्ठ पदाधिकाऱ्यापर्यंत हे वादाचे प्रकरण गेल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात आल्यानंतरच प्रकरण थंडावले.
मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीला जाऊन हा पदाधिकारी परतला होता. त्याने कार्यालयात आल्यानंतर कर्मचाऱ्याला बाजूला होण्यास सांगितले; मात्र कर्मचाऱ्याने हातातील काम पूर्ण होईपर्यंत बाजूला जाण्यास नकार दिला. त्यावर पदाधिकाऱ्याने कामाची तातडी सांगूनदेखील न ऐकल्यावर कर्मचाऱ्याला कडक शब्दात समज दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्याने दुरुत्तर दिल्याने पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यात काही वेळ फ्री स्टाईल चकमक झाली. अखेरीस आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी दोघांना आवरले. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला कामावरून कमी करून नाशिकरोडच्या पदाधिकाऱ्याला समज दिली; मात्र त्या कर्मचाऱ्याला काढून टाकण्यात आल्याने एका गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.