‘सिन्नर नागरी’त असंतोष

By Admin | Updated: April 10, 2017 01:24 IST2017-04-10T01:24:04+5:302017-04-10T01:24:14+5:30

सिन्नर : मुदत संपूनही ठेवीदारांना पैसे परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

Discontent in 'Sinnar Nagri' | ‘सिन्नर नागरी’त असंतोष

‘सिन्नर नागरी’त असंतोष


 सिन्नर : ठेवींची मुदत संपूनही ठेवीदारांना पैसे परत मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर येत्या बुधवार (दि. १२) रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात सिन्नर नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांची बैठक पार पडली. गेल्या अनेक दिवसांपासून पैसे मिळावे यासाठी विनवण्या करुन निवेदने देवून पैसे परत मिळत नसल्याने ठेवीदार संतप्त झाल्याचे शनिवारी झालेल्या बैठकीत दिसून आले.
ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी सहकार खात्याकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नसल्याने ठेवीदारांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. येत्या बुधवारी (दि. १२) रोजी सर्व ठेवीदार नाशिक येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानंतरही पंधरा दिवसात ठेवीदारांना पैसे न मिळाल्यास मुंबईला मंत्रालयावर मोर्चा नेण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
संस्थेच्या संचालक मंडळाची लवकरच निवडणूक होणार असून संस्था अवसानायात जावू नये यासाठी सभासदांकडून निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची चाचपणी यावेळी घेण्यात आली. संस्थेच्या कारभार पूर्ववत सुरु व्हावा अशी इच्छा अनेक ठेवीदार व सभासदांनी व्यक्त केली. त्याचबरोबर संस्थेचा कारभार सिन्नर येथील शाखेतून चालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. अनेकांनी ठेवी परत देतांना अधिकाऱ्यांनी ३० टक्के रक्कम काढून घेतल्याचा आरोप बैठकीत केला.
यावेळी सेवानिवृत्ती प्राचार्य डॉ. आर. डी. पवार, सुभाष जाजू, कृष्णा पवार, डॉ. दिनेश क्षत्रिय, डॉ. जी. एल. पवार, आर. आर. कौठे, मोहन कर्पे, श्रीपाद भसे, खंडेराव सांगळे, अशोक गवळी, संतोष कदम, रोशन पवार, भीमाबाई सानप, सुरेश गजवार, विजय खर्डे, लक्ष्मण पानसरे, बाळू भाबड, सुदाम खर्डे, बालाजी साळी यांच्यासह ठेवीदार उपस्थित होते.
(वार्ताहर)

Web Title: Discontent in 'Sinnar Nagri'