नाशिक - आगामी महापालिका निवडणुकीत १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणून रेकॉर्ड बनवायचा आहे. त्यासाठी जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक नाशिक महापालिकेत निवडून आणू असा विश्वास व्यक्त करत गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीवर भाष्य केले. नाशिकमध्ये आज हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. याठिकाणी विरोधी पक्षातील ५ बड्या नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश झाला. यात उद्धवसेनेचे नेते विनायक पांडे, यतीन वाघ, मनसेचे दिनकर पाटील, काँग्रेसचे शाहू खैरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार नितीन भोसले यांचा समावेश आहे. मात्र या पक्षप्रवेशामुळे भाजपातील अंतर्गत नाराजी उफाळून आली.
नाशिकमधील भाजपा निवडणूक प्रभारी आमदार देवयानी फरांदे यांनी पक्षप्रवेशाला विरोध केला होता. फरांदे समर्थकांनी शहर कार्यालयाबाहेर जोरदार गोंधळ घातला. मात्र फरांदे यांची नाराजी असतानाही मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नेत्यांचा पक्षप्रवेश घेण्यात आला. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, आज भारतीय जनता पक्ष देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वात जास्त आमदार, खासदार, नगरसेवक आहेत. आज ज्यांचं आमच्यावर फार प्रेम होते ते दिनकर आण्णा आज प्रवेश करत आहेत. शाहू खैरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. माजी महापौर यतीन वाघ, विनायक पांडे, माजी आमदार नितीन भोसले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या लोकांनी मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. राज्यभरात अनेक पक्षप्रवेश भाजपात होत आहेत. अनेक दिग्गज नेते जे वर्षानुवर्ष काँग्रेसमध्ये राहिलेत ते भाजपात प्रवेश करत आहेत. आपल्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास वाढत आहे. ज्या गतीने देशाचा आणि राज्याचा विकास सुरू आहे त्यावर विश्वास ठेवून हे नेते पक्षात येत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या त्यात भाजपा महायुतीने ८० टक्के जागा जिंकल्या. बिहारमध्ये भाजपा ८० टक्क्याहून अधिक जागा जिंकल्या. संपूर्ण देश भाजपाच्या पाठीशी उभा आहे. या महापालिकेत काय निकाल येणार हे सांगण्याची गरज नाही. सगळे मोठे नेते आज भाजपात आले आहेत. महापालिकेत १२२ पैकी १०० हून अधिक जागा भाजपाच्या आल्या आहेत. अनेक वर्षापासून कार्यकर्ते पक्षात काम करत आहेत. विरोधी पक्षात आमच्यावर टीका करणारच आहेत पण जे टीका करत होते ते आता भाजपात आले आहेत. या देशाचे भले भाजपा आणि मोदीच करू शकतात अशी भावना महाजन यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, महाजनांचा विश्वास
दरम्यान, जुन्या कार्यकर्त्यांनी काळजी करू नका. कालांतराने तुम्ही बघाल कोणाकोणाला न्याय मिळाला. आम्ही पण जुने आहोत. ३५ ते ४० वर्ष काम करतोय. कार्यकर्ते काय काम करतात, कसा लढा देतात हे आम्हाला माहिती आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांची जाणीव आम्हाला आहे. थोडाफार राग तुमच्या मनात असेल तो साहजिकच आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: लक्ष घालतील आणि इथल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही हे पाहतील. जुने आणि नवीन कार्यकर्ते एकत्रित मिळून कुटुंब म्हणून राहिले पाहिजे. पक्ष वाढला पाहिजे. नाशिकमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. राज्यात नाशिक महापालिकेत सर्वाधिक भाजपा नगरसेवक निवडून आणून रेकॉर्ड करायचा आहे असं आवाहन नाराज कार्यकर्त्यांना महाजन यांनी केले.
Web Summary : Five opposition leaders joined BJP in Nashik, sparking internal resentment. Despite opposition, Girish Mahajan oversaw the entry, aiming for a record-breaking win in upcoming elections, assuring workers concerns will be addressed.
Web Summary : नाशिक में पांच विपक्षी नेता भाजपा में शामिल हुए, जिससे आंतरिक असंतोष भड़क गया। विरोध के बावजूद, गिरीश महाजन ने आगामी चुनावों में रिकॉर्ड जीत का लक्ष्य रखते हुए प्रवेश की निगरानी की और कार्यकर्ताओं को आश्वासन दिया कि चिंताओं का समाधान किया जाएगा।