डिजिटल अरेस्ट! एकाने चक्क फ्लॅट विकला, तर दुसऱ्याने 'एफडी' मोडली; आजोबांनी गमावले ७ कोटी १८ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 19:57 IST2025-10-27T19:55:49+5:302025-10-27T19:57:13+5:30
नाशिक शहरामध्ये दोन महिन्यांत तीन ज्येष्ठ नागरिकांनी तब्बल ७ कोटी १८ लाख रुपये डिजिटल अरेस्ट झाल्यानंतर गमावले.

डिजिटल अरेस्ट! एकाने चक्क फ्लॅट विकला, तर दुसऱ्याने 'एफडी' मोडली; आजोबांनी गमावले ७ कोटी १८ लाख
Nashik Digital Arrest Crime: सायबर गुन्हेगारांनी विणलेल्या 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात अडकून तिघा आजोबांना आयुष्यभर कष्टाने कमाविलेली पुंजी काही वेळेत गमवावी लागली. सीबीआय, सीआयडी, ईडी, क्राइम ब्रेन्च, कस्टम अधिकारी, न्यायाधीश भासवून सायबर गुन्हेगार कारवाईची भीती दाखवतात. दोन महिन्यांत शहरातील तिघा ज्येष्ठ नागरिकांनी तब्बल ७ कोटी १८ लाख रुपये डिजिटल अरेस्टमधून गमावल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
बँक खात्यातून टेरर फंडिंग
'तुमच्या बँक खात्यावरून दहशतवादी संघटनांना फंडिंग करण्यात आले आहे, आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करत आहोत. कोणाला काहीही सांगू नका. तुम्ही आहे त्याच ठिकाणी आमच्यासमोर व्हिडीओ कॉलवर बसून रहा, आमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे द्या, घराबाहेर पडू नका, आमचे अधिकारी साध्या वेशात तुमच्या घराबाहेर नजर ठेवून आहेत...' अशा प्रकारे संवाद साधण्यास सुरुवात करतात.
व्हिडीओ कॉलमध्ये कधी पोलिस ठाणे, तर कधी न्यायालयातील न्यायदान कक्षदेखील बनावटरीत्या दाखविला जातो. तुमच्या नावाने क्रेडिट कार्ड मुंबईत खरेदी केले गेले आहेत, त्यावरून 'मनी लाँड्रिंग', 'टेरर फंडिंग' करण्यात आले असून, यासारख्या गंभीर गुन्ह्यांत तुमचा सहभाग आढळला आहे, असे सांगून ज्येष्ठ नागरिकांची सायबर गुन्हेगार फसवणूक करतात, अशी माहिती शहर सायबर पोलिसांनी दिली आहे.
जेल रोडवरील एका सेवानिवृत्त ज्येष्ठ तक्रारदाराला तर सायबर गुन्हेगारांनी सप्टेंबरमध्ये राहता फ्लॅट विक्री करण्यास भाग पाडले होते. तसेच गंगापूर रोडवरील या महिन्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात ज्येष्ठाला 'एफ. डी.' सुद्धा मोडण्याची वेळ सायबर गुन्हेगारांनी आणली होती.
गेल्यावर्षीही ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक बळी
मागील वर्षीसुद्धा सायबर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये एकूण ४५ तक्रारदार हे ज्येष्ठ होते. या वर्षीही ऑक्टोबरअखेरपर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यांत ३१ तक्रारदार हे ज्येष्ठ आहेत.
व्हिडीओ कॉलवरून अंदाज
डिजिटल अरेस्टच्या दोन घटनांमध्ये सायबर गुन्हेगारांनी ज्या प्रकारे ज्येष्ठांना टार्गेट केले, त्यामध्ये ते एकाकी राहत होते. त्यांची मुले परदेशात स्थायिक झालेली आहेत. व्हिडीओ कॉलवर संबंधितांकडून याचाही अंदाज बांधला गेला असावा.