कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन योजना सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 00:23 IST2020-07-20T00:22:50+5:302020-07-20T00:23:15+5:30
यंदा कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. कोरोनामुळे खप कमी होत असल्याने उत्पादकांसह संबंधित घटकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून निर्यातीला चालना देण्याची गरज व्यक्त होत आहे.

कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन योजना सुरू करण्याची मागणी
लासलगाव : यंदा कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. कोरोनामुळे खप कमी होत असल्याने उत्पादकांसह संबंधित घटकांना त्याचा मोठा फटका बसत असल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून निर्यातीला चालना देण्याची गरज व्यक्त होत आहे.
कांद्याचे दर गगनाला भिडल्याने केंद्राने २९ सप्टेंबर २०१९ रोजी निर्यातबंदी आणली होती. याचा फटका अनेक घटकांना बसला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत निर्यातीत ५५ टक्के घट झाली आहे. त्यामुळे देशाला १५१४ कोटींचा परकीय चलनाचा फटका बसला आहे. एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० काळात ९.९५ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात होऊन देशाला १९५३ कोटी रु पयांचे परकीय चलन मिळाले आहे.
देशात आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये खरीप, लेट खरीप, रब्बी असे मिळून २२८.१९ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. त्यात यंदा १० टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी केंद्राने कांदा दर स्थिर करण्यासाठी नर्यातबंदी,साठवणुकीवर मर्यादा आणल्या. तब्बल पाच महिने कांदा निर्यातबंदी राहिल्याने निर्यात ठप्प झाली होती. त्यानंतर मुबलक पुरवठा झाल्याने कांद्याचे दर कोसळण्यास
सुरुवात झाली. केंद्राने दरातील घसरण थांबवण्यासाठी १५ मार्च २०२०पासून निर्यातबंदी उठविली. या सर्वांचा परिणाम देशातील कांदा निर्यातीला बसला आहे.
यंदाही कांद्याचे बंपर उत्पादन झाले आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय पूर्ण बंद असल्याने कांद्याचा खप कमी झाला आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा कवडीमोल दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याकरिता केंद्र सरकारने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करून निर्यातीला चालना देण्याची गरज आहे.