लॉण्ड्री व्यावसायिकांना वीज बिलात सवलतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 15:41 IST2018-10-06T15:40:46+5:302018-10-06T15:41:11+5:30
निवेदन : शासन निर्णयाची अंमलबजावणी नाही

लॉण्ड्री व्यावसायिकांना वीज बिलात सवलतीची मागणी
सटाणा : राज्य शासनाने लॉड्री व प्रिंटींग प्रेस व्यवसाय करणाऱ्यांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्याचे जाहीर केले आहे. मात्र त्याची वीज महावितरण कंपनीने अद्याप अंमलबजावणी केली नाही. शासनाचा अध्यादेश तत्काळ अमलात आणावा, या मागणीसाठी संबधित व्यावसायिकांनी वीज महावितरण कंपनीचे विभागीय अभियंता अनिल उईके यांना निवेदन सादर केले.
लॉड्री व प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय करणाºयांना शासनाने सवलतीच्या दरात वीज पुरवठा करावा,अशी मागणी राज्य पातळीवरील संघटनानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. व्यावसायिक दराने विजेच्या आकारणीमुळे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत आल्यामुळे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर शासनाने त्याची गंभीर दखल घेत सवलतीच्या दराने संबधित व्यावसायिकांना वीज पुरवठा करावा असा निर्णय घेऊन तसा अध्यादेश काढला आहे. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी केली जात नाही. व्यावसायिक दरानेच बिलांची आकारणी केली जात आहे. सदर प्रकार म्हणजे शासनाच्या आदेशाची एकप्रकारे पायमल्ली होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. याप्रसंगी शेखर परदेशी ,भगवान परदेशी ,विशाल खैरनार ,अशोक मोगरे, कैलास परदेशी,चंदन शिंदे,विनोद परदेशी,दीपक मोगरे,अनिल मोगरे,हेमंत शिंदे,सतीश खैरनार यांनी अभियंता अनिल उईके यांना निवेदन दिले.