Delivery grapes to Dubai market! | कळवणची द्राक्षे दुबईच्या बाजारात !
कळवणची द्राक्षे दुबईच्या बाजारात !

कळवण (मनोज देवरे) : तालुक्यासह सटाणा, कळवण, मालेगाव व देवळा तालुक्यांत पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, चालू वर्षी द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने माल कमी प्रमाणावर निघत आहे. तरीही थोड्याफार शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या द्राक्षांची दुबईमध्ये निर्यात सुरू झाली आहे.
भेंडी येथे सर्व सोयीसुविधायुक्त निर्यात केंद्र वातानुकूलित अशा स्वरूपाचे बांधण्यात आले आहे. या ठिकाणी शेतीमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणज्यि मंत्रालयाने मान्यता दिल्याने निर्यात होऊ लागली आहे. कळवण तालुक्यातील शेतकरी व कळवण बाजार समितीत महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ यांच्या सहकार्यातून सदगुरू एंटरप्राइजेसच्या माध्यमातून द्राक्षाची दुबईमध्ये निर्यात सुरू झाली आहे.
शेतमालाची साठवणूक करून त्याची निर्यात करण्याची सुविधा भेंडी येथील कांदा, द्राक्ष सुविधा केंद्रात आहे. या भागातील मानूरचे भूमिपुत्र पणन मंडळाचे सरव्यवस्थापक सुनील पवार व कळवण येथील शेतकरी सहकारी संघाच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ पुणे यांच्या वतीने सुविधायुक्त निर्यात सुविधा केंद्र कळवण तालुक्यात उभारण्यात आले आहे. त्यामुळेच कसमादे पट्ट्यातील शेतीमाल निर्यातीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. द्राक्ष निर्यातीसाठी हाताळणी, प्रतवारी व वातानुकूलित प्रक्रि या करून द्राक्ष निर्यात सुरू झाली आहे. कसमादे परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे.
कृषी व पणन मंडळाचे प्रभारी उपसरव्यवस्थापक बहादूर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू आहे. निर्यातदार संस्थेचे प्रशांत नारकर, प्रांजली नारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वपाल मोरे, व्यवस्थापक सीताराम बिष्णोई, सांकेतिका जोरे आदी निर्यात सुविधा केंद्राच्या माध्यमातून शेतकर्यांसोबत कामकाज पाहत आहेत. थेट शेतात शेतीमालाची खरेदी करून परदेशात निर्यात केली जात असल्याची माहिती सदगुरू एंटरप्राइजेसचे संचालक प्रशांत नारकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वपाल मोरे यांनी दिली.

Web Title:  Delivery grapes to Dubai market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.