अडथळा ठरणारे बॅरिकेड््स हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 01:05 IST2019-11-12T01:04:50+5:302019-11-12T01:05:21+5:30
नाशिक आणि सिन्नरला जोडणारा भगूर येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपासून लोकार्पण सोहळ्याअभावी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. सदर पुलाचे काम पूर्णत्वात आले असले तरी उद्घाटनाचा मुहूर्त नसल्याने पुलाचा वापर होऊ नये म्हणून पुलाच्या मार्गावर टाकलेले लोखंडी बॅरिकेड्स राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी हटविले आहे.

अडथळा ठरणारे बॅरिकेड््स हटविले
भगूर : नाशिक आणि सिन्नरला जोडणारा भगूर येथील उड्डाणपूल गेल्या दोन वर्षांपासून लोकार्पण सोहळ्याअभावी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. सदर पुलाचे काम पूर्णत्वात आले असले तरी उद्घाटनाचा मुहूर्त नसल्याने पुलाचा वापर होऊ नये म्हणून पुलाच्या मार्गावर टाकलेले लोखंडी बॅरिकेड्स राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी हटविले आहे.
येथील विजयनगर चौफुली ते नाका नं. २ पर्यंतचा भगूर रेल्वेगेटवरील सिन्नर-नाशिकला जोडणारा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभाग केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत बांधण्यात आलेला आहे. या पुलाचे लोकार्पण होत नसल्यामुळे या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड््स टाकण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा विशाल बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली पुलावरील लोखंडी बॅरिकेड हटविण्यात येऊन रस्ता मोकळा करण्यात आला.
या कामाचा पूर्णत्वाचा कालावधी १८ महिने असताना या कामासाठी दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी लोकार्पण सोहळ्याला आचारसंहिता व मंत्र्यांची तारीख मिळत नसल्यामुळे रेल्वे खात्याकडून उड्डाण पुलावर लोखंडी बॅरिकेड टाकण्यात आले होते. या लोखंडी बॅरिकेडमुळे लोकांना अडचण होत असून, दोन वेळा अपघात झाले व यापुढेदेखील जीवघेणे अपघात होण्याची शक्यता आहे. पुलावर पथदीपदेखील बसविले नाहीत त्यामुळे धोका अधिक वाढलेला आहे. पूल सुरू व्हावा यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही तांत्रिक कारणे सांगून पुलाचे उद्घाटन टाळले जात असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, देवळाली कॅम्प कार्याध्यक्ष प्रशांत बच्छाव, विशाल बलकवडे, बिसमिल्ला खान, आनंद झांजरे, नीलेश गोरे, अमोल पाटील, राहुल कापसे, मंजूषा महेश, गायत्री झांजरे, स्वाती मोरे, संगीता झाजरे, साहील मोरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकरते उपस्थित होते.
स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
उड्डाणपुलाच्या बाजूलाच नूतन माध्यमिक शाळा व कॉलेज असल्यामुळे वाहनांचे वेग नियंत्रणात राहण्यासाठी दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर बसविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली. तसेच भगूरच्या व्यापाऱ्यांना नुकसान होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने रेल्वेखालील बोगद्याचे कामदेखील लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.