सटाणा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी दीपक पाकळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:52 IST2021-01-29T20:06:53+5:302021-01-30T00:52:06+5:30
सटाणा : येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक पाकळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. विद्यमान उपनगराध्यक्ष राकेश खैरनार यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने आरोग्य सभापती दीपक पाकळे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सटाणा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी दीपक पाकळे
सटाणा नगरपरिषद सभागृहात उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी दीपक पाकळे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. दीपक पाकळे यांना सूचक म्हणून नगरसेवक महेश देवरे, तर अनुमोदक नगरसेवक राकेश खैरनार होते.
निवडणूक निर्णय अधिकारी शुभम गुप्ता यांनी दीपक पाकळे यांची उपनगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करताच पाकळे समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे, नितीन सोनवणे, दिनकर सोनवणे, राहुल पाटील, महेश देवरे, मुन्ना शेख, बाळू बागुल, सुनीता मोरकर, सोनाली बैताडे, सुवर्णा नंदाळे, सुरेखा बच्छाव, डॉ. विद्या सोनवणे, संगीता देवरे, शमा मन्सुरी, शमीम मुल्ला, रूपाली सोनवणे, भारती सूर्यवंशी, पुष्पा सूर्यवंशी आदी उपस्थित होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व दीपक पाकळे समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सटाणा शहरात भव्य मिरवणूक काढली.