The decision of the standing committee on Nashik Municipal Corporation's standing committee will be decided on Thursday | नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाचा गुरूवारी फैसला
नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाचा गुरूवारी फैसला

ठळक मुद्देभाजपात रस्सीखेचपालकमंत्रीच करणार फैसला


नाशिक- महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक अखेरीस जाहिर झाली असून येत्या गुरूवारी म्हणजेच १८ जुलैस निवडणूक होणार आहे. विभागीय आयुक्तांनी महापालिकेला याबाबत कळवले असून सोमवारपासून अर्ज वितरण सुरू होणार आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीबरोबरच त्याच दिवशी शहर सुधार, विधी, आरोग्य वैद्यकिय आणि महिला तसेच बाल कल्याण समितीच्या सभापतीपदासाठी देखील याच दिवशी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सुरज मांढरे हे काम बघणार आहेत.
नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्यांची मुदत २८ फेबु्रवारीसच संपली परंतु त्यानंतर सदस्य नियुक्त करताना भाजपाच्या कोट्यातून आठ सदस्य नियुक्त करण्यास शिवसेनेने विरोध केला होता. भाजपाच्या एका नगरसेवकाच्या निधनामुळे या पक्षाचे तौलनिक संख्याबळ कमी झाले असून त्यामुळे भाजपाचा एक सदस्य कमी होऊन सेनेचा सदस्य वाढतो असा सेनेचा दावा होता. त्यामुळे न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले होते. दरम्यान लोकसभा निवडणूक होत असल्याने त्या धामधुमीत विभागीय आयुक्त कार्यालयाने एक सदस्य नियुक्तीस परवानगी दिली नाही. ती आता दिल्यानंतर गेल्या ९ जुलैस समितीवर कमलेश बोडके यांची वर्णी लागली असून अन्य समित्यांचे सदस्य देखील पक्षीय तौलनिक बळानुसार नियुक्त करण्यात आले. सर्व समित्यांवर भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपाचेच सभापती होणार हे उघड आहे.

दरम्यान, स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपात चुरस असून गणेश गिते, कमलेश बोडके आणि उध्दव निमसे यांच्यात काट्याची स्पर्धा आहे. अर्थात, तिघेही पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांपैकी असून त्यामुळे तेच याबाबत निर्णय घेतील असे सांगण्यात येत आहे.


Web Title: The decision of the standing committee on Nashik Municipal Corporation's standing committee will be decided on Thursday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.