नाशिकमध्ये धोकादायक वाडा कोसळला; तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 10:03 IST2019-06-28T10:02:01+5:302019-06-28T10:03:03+5:30
जखमींवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू

नाशिकमध्ये धोकादायक वाडा कोसळला; तीन जखमी
नाशिक- शहरातील जुने नाशिक गावठाण भागात आज सकाळी सहा वाजता एक धोकादायक वाडा कोसळल्याने तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जुने नाशिक भागातील गावठाण भागातील संभाजी चौक परिसरातील काकडे वाडा सकाळी कोसळला. त्यात चार जण अडकले होते. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली आणि चौघांची सुटका केली. त्यातील तीन किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नाशिक शहरात कालपासून जोरदार पाऊस सुरू झाला असून रात्रीही पावसाची संततधार सुरूच होती. सकाळीदेखील अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे धोकादायक वाड्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील धोकादायक वाड्यांना महापालिकेने अगोदरच नोटिसा बजावल्या असून जे नागरिक असे वाडे दुरुस्त करणार नाही त्यांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात येईल आणि धोकादायक भाग पाडण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे.