एक रुपयाच्या वादात गमावला जीव; पानटपरीवर सिगारेट मागितली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:36 IST2025-04-03T14:36:42+5:302025-04-03T14:36:54+5:30
पानटपरी चालकाच्या मारहाणीनंतर ग्राहकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

एक रुपयाच्या वादात गमावला जीव; पानटपरीवर सिगारेट मागितली अन्...
Nashik Crime: नाशिक शहरातील सिडको परिसरातील छत्रपती संभाजी स्टेडियमजवळ असलेल्या एका पानटपरीच्या दुकानात आलेल्या इसमाने सिगारेट एक रुपयाच्या मागितल्यानंतर फरकामुळे दुकानदार व त्या ग्राहकात वाद झाले. यावेळी दुकानदाराकडून झालेल्या मारहाणीनंतर ग्राहकाचा उपचारानंतर घरी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर अंबड पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेतले आहे.
बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियमजवळ असलेल्या एका पान स्टॉलवर विशाल भालेराव (५०, रा, पाथर्डी फाटा) हा सिगारेट घेण्यासाठी आला होता. यावेळी सिगारेटच्या किमतीवरून भालेराव व दुकानदार संशयित बापू जगन्नाथ सोनवणे (५९, शिवपुरी चौक, सिडको) यांच्यात वाद झाले. त्याने सिगारेटचे अकरा रुपये मागितले परंतु भालेराव याने हे सिगारेट सर्वत्र दहा रुपयांना मिळते तुम्ही अकरा रुपयाला का विकतात असा जाब विचारला. त्याचा राग आल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढला आणि सोनवणे याने भालेरावच्या डोक्यात लाकडी दंडुक्याने प्रहार केला. यामुळे तो जबर जखमी झाला.
याप्रकरणी अंबड पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत तपास करत कारवाई केली जात होती. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितले. किरकोळ पैशांवरून जीव गमवावा लागल्याने सिडको परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
मालकाने हलवले रुग्णालयात
जखमी अवस्थेत तो कामाच्या ठिकाणी गेला. तेथे त्याच्या मालकाचे रक्तस्त्रावाकडे लक्ष गेल्यानंतर त्यास खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डोक्यावर झालेल्या जखमेमुळे त्यास तीन टाके पडले. यानंतर भालेराव घरी गेल्यानंतर संध्याकाळच्या सुमारस त्यास अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्राथमिक तपासणी करून त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. शासकीय रुग्णालयात त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी तपासून मयत घोषित केले.