Crop corners due to rain | पावसाअभावी करपला मका
पावसाअभावी करपला मका

ठळक मुद्देदेवगाव परिसरातील शेतकरी चिंतातुर ; खरिपातील पिकांची वाढ खुंटली

देवगाव : पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले तरी निफाड तालुक्यातील अनेक भागांत अद्यापही जोरदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. खरिपातील पिकांची वाढ खुंटली असून, काही ठिकाणी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. दुबार पेरणीचे सावट शेतकरीवर्गावर घोंगावत असल्याने शेतकरीवर्ग चातकासारखी पावसाची वाट बघत आहे. देवगाव परिसरातील जलसाठे अद्यापही तहानलेले आहेत.
देवगाव परिसरातील बंधारे व तलाव कोरडेच आहेत. इतर काही दिवसांत अशीच परिस्थिती राहिली तर देवगावकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. तालुक्यातील फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीसाठा कमी झाला असल्याचे चित्र होते. एप्रिल व मे महिन्याच्या कडक उन्हामुळे परिस्थितीत आणखीनच भर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे बहुतेक भागाचा पाणीसाठा खालावला असल्याने अनेक भागांत भीषण पाणीटंचाईची स्थिती आहे.
काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसावर पेरणी व लागवड झालेली आहे. काही भागातील पिके सलाईनवर असल्याने पावसाची अपेक्षा आहे. आता तर शेतकऱ्यांनी पिकांना मोठा खर्च केला. त्यात पावसाने दडी मारल्याने आणि दोन महिन्यांत पिकांना आवश्यक तेवढा पाऊस पडला नाही तर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.
पाणीटंचाईचे सावट अधिक गडद
बळीराजाच्या पिकांना मिळणारा मातीमोल भाव, सक्तीची वीजबिल वसुली, रासायनिक खतांचे वाढते भाव, मजूर टंचाई, सोसायट्यांचे कर्ज व पावसाने पाठ फिरविल्याने परिसरात शेती व्यवसाय तोट्यात असून, वाढती महागाई यामुळे परिसरातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे. वेधशाळेच्या अंदाजाने आशा पल्लवित झालेल्या शेतकऱ्यांनी पेरणीला प्राधान्य दिले असले तरी, त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे ऊन धरायला लागलेली पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. देवगाव परिसरातील अनेक गावांत पाणीटंचाईने डोकेवर काढले आहे. येणाºया काळात चांगला पाऊस न झाल्यास खरीप पिकांसाठी लागणाºया सिंचनासह पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होईल.


Web Title: Crop corners due to rain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.