Coronavirus: संचारबंदीत क्रिकेट खेळल्याने नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 10:24 IST2020-04-11T22:46:17+5:302020-04-12T10:24:04+5:30
शासनाच्या संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवत त्यांच्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Coronavirus: संचारबंदीत क्रिकेट खेळल्याने नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा
सिडको : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदी उल्लंघन केल्याप्रकरणी प्रकरणी सिडको प्रभाग सभापती दीपक दातीर यांच्यासह त्यांच्या १२ कार्यकर्त्यांवर अंबड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या संचारबंदीच्या काळात जनतेला घरात राहण्यास प्रवृत्त करण्याऐवजी काही मित्रांसमवेत ते क्रिकेट खेळल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
मनपा सिडको प्रभाग सभापती असलेले व प्रभाग २८ मधील नगरसेवक असलेले दीपक दातीर यांनी शासनाच्या संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवत त्यांच्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याला अनुसरून चौकशी करून ही कारवाई करण्यात आली. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. घरातून बाहेर निघता येत नाही. रोजंदारी करणाऱ्यांचा रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट उभे आहे. अशा स्थितीत लोकप्रतिनिधींनी नागरिकांना धीर देणे, त्यांना मदत करणे गरजेचे असताना नगरसेवक वेळ जाण्यासाठी क्रिकेट खेळताना दिसत आहेत.
हा व्हिडीओसमोर आला असून, त्यात दीपक दातीर हे त्यांच्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळत असताना दिसत आहे. हा व्हिडिओ एक युवतीने काढला आहे. याबाबत अंबड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून तेथील पंचनामा केला आहे. त्यानंतर पोलीस हवालदार कैलास निबेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रभाग सभापती दीपक दातीर यांच्यावर संचारबंदी उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.