ऑफिसमधील महिलेसोबत अश्लील चॅटिंग करणं अंगलट; कर्मचाऱ्याला कोर्टाने सुनावली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:21 IST2025-03-18T13:20:40+5:302025-03-18T13:21:12+5:30
आरोपीने पीडित फिर्यादी महिलेसोबत संवाद साधताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता.

ऑफिसमधील महिलेसोबत अश्लील चॅटिंग करणं अंगलट; कर्मचाऱ्याला कोर्टाने सुनावली शिक्षा
Nashik Crime: नाशिक शहरातील एका शासकीय कार्यालयात एकत्रित नोकरीवर असताना तत्कालीन वरिष्ठ लिपिक आरोपी महेंद्र पवार याने सहकारी महिला कर्मचाऱ्यासोबत अश्लील व आक्षेपार्ह भाषेत संवाद साधल्याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नदीम पटेल यांनी त्यास दोषी धरले. सोमवारी तीन महिन्यांचा साधा कारावास व एक हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली.
शासकीय कार्यालयात कर्तव्य बजावत असताना ३० डिसेंबर २०१२ साली पवार याने पीडित फिर्यादी महिलेसोबत संवाद साधताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. दरम्यान, पीडिता प्रसूती रजेवर असतानाही संबंधिताने वारंवार फोन करत 'तुझ्या टेबलचे काम पूर्ण कर...' याबाबत सांगून त्रास दिला होता. याबाबतची तक्रार त्यांनी कार्यालय अधीक्षकांकडे केली. तसेच महासंचालक कार्यालयाकडेही ई-मेलद्वारे तक्रार केली होती. यानंतर विभागीय चौकशी पवार यांची करण्यात आली. तसेच दोघांना समक्ष बोलावून महिला तक्रार निवारण समितीपुढेही चौकशी करण्यात आली.
२०१३ मध्ये दाखल झाला होता गुन्हा..
टेबल बदलण्याबाबतचा आदेश पाठवला असता तो आदेशदेखील पवार याने दाबून ठेवला होता. माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी या आदेशाची प्रत मिळवली. त्यानंतर महासंचालकांच्या आदेशाने पीडितेने पोलिस आयुक्तालयाकडे तक्रार अर्ज केला. तेथे त्यांना व पवार यांना बोलावून घेत चौकशीही करण्यात आली. यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात ६ ऑक्टोबर २०१३ साली फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. सोमवारी झालेल्या सुनावणीत सरकार पक्षाकडून अॅड. सुनीता चिताळकर यांनी युक्तिवाद करत सात साक्षीदार तपासले.
दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपी महेंद्र पवार यास दोषी धरले. दंडाची रक्कम न भरल्यास १५ दिवसांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.