हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले दाम्पत्य, दागिन्यांसह रोकड चोरीला; पोलिसांनी १२ तासांत आवळल्या आरोपींच्या मुसक्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:10 IST2025-01-23T17:07:55+5:302025-01-23T17:10:25+5:30
दुपारच्या सुमारास दाम्पत्य तालुक्यातील मन्हळ शिवारात समृद्धी महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते.

हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले दाम्पत्य, दागिन्यांसह रोकड चोरीला; पोलिसांनी १२ तासांत आवळल्या आरोपींच्या मुसक्या!
सिन्नर : समृद्धी महामार्गाने प्रवास करत असताना खंबाळे शिवारातील हॉटेलमध्ये जेवणासाठी दिल्लीचे दाम्पत्य थांबले होते. त्यांचे ५ लाखांचे हिऱ्यांचे दागिने व रोकड चोरणाऱ्यास वावी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. चोरट्याकडून पोलिसांनी चोरलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन संशयिताला अटक केली आहे.
दिल्ली येथील व्यापारी असलेले कमल रतनलाल अग्रवाल हे त्यांच्या पत्नी व इतर नातेवाइकांसोबत महाराष्ट्रात फिरण्यासाठी आले होते. सोमवारी ते छत्रपती संभाजीनगर येथून ट्रॅव्हल्सने समृद्धी महामार्गाने नाशिककडे येत होते. दुपारच्या सुमारास ते तालुक्यातील मन्हळ शिवारात समृद्धी महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरील हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. यावेळी अग्रवाल यांच्या पत्नीने रोख रक्कम व दागिने असलेली पर्स जेवताना टेबलच्या खाली ठेवली होती. मात्र, जेवण झाल्यानंतर ते पर्स न घेताच तेथून नाशिककडे निघून गेले. नाशिक येथे पोहचल्यानंतर त्यांना पर्स नसल्याचे निदर्शनास आले.
कामगारांची कसून चौकशी
ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश शिंदे यांनी पथक तयार करून गुन्ह्याचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. पथकाने हॉटेलमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तेथील सर्व कामगारांची कसून चौकशी केली. तपासाअंती सदर चोरी हॉटेलचा कॅशिअर रवि राज रेड्डी (४०, मृळ रा. नागपूर) याने ही चोरी केल्याचे आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. हॉटेलमध्येच एका खोलीत लपवून ठेवलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
असा होता मुद्देमाल
पर्समध्ये ७५ हजारांची रोकड, १ लाख ५० हजार रुपये किमतीची व २ लाखांची अशा दोन हिन्ऱ्यांच्या अंगठ्या, ६० हजारांचे दोन टीसॉट कंपनीचे लेडीज घड्याळे असा एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. अग्रवाल यांनी वावी पोलिस ठाण्यात येत अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातकाल पाउले उचलुन सुत्रे फिरवली. गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश आले.
कामगिरीचे कौतुक
अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. कारवाई उपनिरीक्षक विजय कोठावळे, हवालदार सतीश बैरागी, अजय महाजन, साहेबराव बलसाने, शहाजी शिंदे, बाबासाहेब शिंदे, सचिन कहाणे, कैलास गोरे, देविदास माळी, नवनाथ आडके, विक्रम लगड, तुषार दयाळ यांच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक विजय कोठावळे करत आहेत.