कोरोनामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 01:08 IST2020-04-12T20:48:25+5:302020-04-13T01:08:56+5:30
मानोरी : कोरोनाच्या संकटाने हतबल झालेला शेतकरीच आता, व्यापारी-विक्रेता होऊन रस्त्यावर टरबूज, द्राक्ष विकताना राज्यमहामार्गांवर दिसून येत आहे.

कोरोनामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांचे हाल
मानोरी : कोरोनाच्या संकटाने हतबल झालेला शेतकरीच आता, व्यापारी-विक्रेता होऊन रस्त्यावर टरबूज, द्राक्ष विकताना राज्यमहामार्गांवर दिसून येत आहे. कवडीमोल दरात शेतमाल विकावा लागत असल्याने त्याचा पुढचे आर्थिक संकट अधिक गडद होत चालले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी आणि जमावबंदी लागू केल्याने बाजारपेठा, वाहतूक व्यवस्था बंद पडल्या आहेत. याबरोबरच गावोगाव सीमाबंदी सुरू झाली. गाव परिसरातील सर्वच आठवडे बाजार बंद झाले. स्थानिक खरेदीदार, व्यापारी नाहीत आणि निर्यातबंदीने लाखो रुपये खर्चून तयार केलेला शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच पडून आहे. वाढत्या उन्हाच्या चटक्याने नाशवंत असलेली टरबूज, द्राक्षे, पेरू, चिकू आदी फळे शेतात ठेवून करणार काय, असा विचार करून हतबल झालेला शेतकरीच आता व्यापारी होऊन रस्त्यावर टरबूज, द्राक्ष विकताना दिसून येत आहे. महामार्गांवरही अत्यावश्यक सेवा वगळून रहदारी पूर्णत: ठप्प असल्याने टरबूज, द्राक्षविक्रेत्यांना खरेदीदार भेटणेदेखील दुरापास्त झाल्याचे द्राक्ष उत्पादक विक्रेते शेतकरी प्रवीण मिटके यांच्यासह शंकर ठुबे, नितीन पेंढारकर, पांडुरंग गुंजाळ, आकाश भोसले यांनी सांगितले. द्राक्षांना १५ रुपये प्रतिकिलो, तर टरबूज १५ ते ३० रुपये प्रतिनग अशा कवडीमोल दराने विकण्याची नामुष्की यंदा शेतकºयांवर ओढवली आहे. आसमानी, सुलतानी संकटांशी सामना करत फळ उत्पादक शेतकरी वर्गाने लाखो रुपये खर्च करून व मोठ्या मेहनतीने द्राक्ष, टरबूज आदी फळपिके घेतली, मात्र कोरोनाच्या फटक्याने द्राक्ष आणि टरबूज उत्पादकांसह सर्वच शेतकºयांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडून गेले आहे.