कोरोनामुळे फुलशेती उत्पादकांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:40 IST2021-04-20T22:48:04+5:302021-04-21T00:40:07+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील तीन ते चार वर्षांपासून खर्चाच्या तुलनेत उत्पन्न येत नसल्याने शेतकरी विवंचनेत सापडला असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आता फुलशेती उत्पादकांचीही कोंडी केली आहे. शेतात मोठ्या कष्टाने फुलवलेल्या टवटवीत फुलांना मागणीअभावी फेकून देण्याची वेळ आली असून, भांडवलासाठी घेतलेले बँकांचे कर्ज थकल्याने चिंतेत भर पडली आहे.

दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकरी आपल्या शेतात प्रत्येक हंगामात नवनवीन प्रयोग करताना विविध फळभाज्या, तसेच फुलशेती करण्यावर भर देत असतात. कोकणगाव येथील शिवाजी शेळके यांनी आपल्या एक एकर शेतात गुलाब शेतीचे पॉलिहाउस तयार केले होते. कोरोनाचा संसर्ग नव्हता तोपर्यंत गुलाब शेतीतून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत होते. त्यामुळे भांडवलासाठी विविध बँकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी अडचण येत नव्हती; परंतु गेल्या हंगामापासून कोरोना, वातावरणातील बदलाव, अवकाळी पाऊस आदी संकटांमुळे फुलशेती अडचणीत आली. कोरोनाची दुसरी लाट भयानक असल्याने पुन्हा एकदा धार्मिक कार्यक्रम, मंदिरे, विविध धार्मिक विधी शासनाच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आल्याने फुलांना मागणी नाही. त्यामुळे लाखो रुपयांची टवटवीत फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विविध बँकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे व संसाराचा गाडा कसा ओढावा, असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत.
फुलशेतीसाठी लाखो रुपये खर्च करूनही हातात काहीच उत्पन्न आले नाही. त्यामुळे सध्या आमच्यावर लाखो रुपयांचे कर्जाचे ओझे झाले आहे. त्यामध्ये वसुलीसाठी बँकांचा तगादा सुरूच असल्याने कोंडी झाली आहे.
-शिवाजी शेळके, गुलाब फुलशेती उत्पादक, कोकणगाव खुर्द