जळगांव फाटा ते कुरडगांव रस्त्याची अवस्था दयनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 17:37 IST2020-12-28T17:36:32+5:302020-12-28T17:37:16+5:30
निफाड : जळगांव फाटा ते कुरडगांव या ४ किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सदरचा रस्ता तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

जळगांव फाटा ते कुरडगांव रस्त्याची अवस्था दयनीय
या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी झाले होते. मात्र, हे सर्व काम उखडले असून, ठिकठिकाणी मोठे खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, याचा अंदाज वाहनचालकांना येणे मुश्कील झाले आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. सध्या ऊसाने भरलेले ट्रक, ट्रॅक्टरची या रस्त्याने ये-जा चालू असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे ही वाहने हेलकावे खात जात असल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. कुरडगाव येथून कांद्याचे ट्रॅक्टर, भाजीपाल्याची वाहने यांची वाहतूक होत असते, परंतु मोठी वाहने चालविणे मोठे जिकरीचे झाले आहे. जळगांव फाटा ते कुरडगांव रस्त्यालगतच्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याने, या रस्त्यावरून रात्रीच्या सुमारास वाहने चालविताना जीव मुठीत धरून चालवावी लागतात. सदर रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून होत आहे.