दंड कमी करण्यास आयुक्तांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:35 IST2021-02-24T23:37:35+5:302021-02-25T01:35:33+5:30
नाशिक- मास्क न वापरणारे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या थुंकीबहाद्दरांवर एक हजार रूपयांचा दंड करणे जाचक असल्याचा दावा करीत हा दंड कमी करण्याची सूचना स्थायी समितीने दिली असली तरी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी त्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी एक हजार रूपये प्रति व्यक्ती याचप्रमाणे दंड आकारणी केली असून एकूण १८३ नागरीकांकडून १ लाख ८३ हजार रूपयांचा दंड वसुल केला आहे.

शहरात कोरोना संसर्ग वाढु लागला असून पुन्हा एकदा भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे गेल्या रविवारी (दि. २१) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासकीय यंत्रणांच्या घेतलेल्या बैठकीत मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई म्हणून दंडाची रक्कम दोनशे रूपयांवर एक हजार रूपये करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी साथ रोग प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये अधिसूचना काढून एक हजार रूपये दंड आकरण्याची तरतूद केली. परंतु स्थायी समितीत काँग्रेसचे राहूल दिवे यांनी त्यास विरोध केला आणि सभापती गिते यांनीही दंड कमी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र, आयुक्त कैलास जाधव यांनी त्यास नकार दिला. दंड रकमेत वाढ करण्याचा निर्णय जिल्ह्याच्या टास्क फोर्स मध्ये घेण्यात आला असून संपुर्ण जिल्ह्यात त्यांची अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले.
दरम्यान, दिवसभरात महापालिका, पोलीस आणि महसूल विभागाने दंडात्मक कारवाई सुरूच ठेवली असून बुधवारी (दि.२४) एकाच दिवसात १८३ प्रकरणात १ लाख ८३ हजार रूपये दंड वसुल केला.
विभाग प्रकरणे दंड
नाशिकरोड ४८ ४८०००
पश्चिम १२ १२,०००
पूर्व ५० ५००००
सिडको ३३ ३३०००
पंचवटी १७ १७०००
सातपूर २३ २३०००
एकुण १८३ १८३०००