थंडीची लाट! शीतलहरीने केला कहर अन् गारठले नाशिककर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 11:39 IST2022-01-26T11:37:25+5:302022-01-26T11:39:53+5:30
शहरात मागील दोन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. किमान तापमानाचा पारा या दोन दिवसांमध्ये कमालीचा वेगाने घसरत आहे. कमाल ...

थंडीची लाट! शीतलहरीने केला कहर अन् गारठले नाशिककर
शहरात मागील दोन दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. किमान तापमानाचा पारा या दोन दिवसांमध्ये कमालीचा वेगाने घसरत आहे. कमाल तापमानातही घट होत असून मंगळवारी २३.६ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले. यामुळे नाशिककरांना दिवसभर थंडीची तीव्रता जाणवली. पहाटे शहरावर धुक्याची दुलई पसरलेली होती. हवेत बाष्पचे प्रमाण अधिक राहिल्याने आर्द्रताही ८२ टक्क्यांपर्यंत पोहचली. या तुलनेत संध्याकाली आर्द्रता कमी राहिली. दुपारी बारा वाजेनंतर ऊन कडक पडल्यामुळे गारठलेल्या नागरिकांची हुडहुडी कमी होण्यास मदत झाली.
अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अन् शनिवारपासून पाकिस्तानात उठलेल्या धुळीच्या वादळाने रविवारी गुजरातच्या दिशेने सुरू केलेले मार्गक्रमण यामुळे शहराच्या वातावरणात या चार दिवसात कमालीचा बदला झाला आहे. सोमवारपासून शहरात ऊन चांगले पडत असल्याने थंडीचा सामना करणे नागरिकांना श्यक्य होत आहे. थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे दोन दिवसांपासून सकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नागरिकांकडून दिवसभर ऊबदार कपड्यांच्या वापरावर भर दिला जात आहे. गोदाघाटासह उघड्यावर राहणाऱ्या नागरिकांकडून शेकोट्या पेटवून ऊब मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच चहालाही मागणी वाढली असून चहाविक्रीच्या दुकानांवर गर्दी दिसू लागली आहे.
१७ जाने. २०२०ची पुनरावृत्ती
मागील वर्षी १७ जानेवारी रोजी थंडीचा असाच कडाका नाशिककरांनी अनुभवला होता. त्या दिवशीही शहराचे किमान तापमान ६ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली होती. २३ डिसेंबर रोजीसुद्धा पारा ८.२ अंशापर्यंत खाली घसरल्याने नाशिककर गारठले होते. ७ जाने. २०११ सालीदेखील ४.४ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. २०१३ सालीसुद्धा ६ जानेवारीला पारा ४.४ अंशापर्यंत खाली घसरला होता. २०१८ साली २५ जानेवारी रोजी ७.२ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते.
ही शहरे गारठलेली.....
नाशिक-६.३, पुणे-८.५, मालेगाव-८.८, महाबळेश्वर-८.८, अहमदनगर-७.९, जळगाव-८.६, औरंगाबाद-८.८, बुलडाणा- ९.२, नागपूर-१०.६, अमरावती-१०.८, परभणी-१०.८, सोलापूर-११.२