एकीकडे नाशिक पोलीस भाजप सेनेमध्ये पेटलेला वाद मिटविण्यासाठी बंदोबस्तात असताना दुसरीकडे मंगळवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास दोन अज्ञात युवकांनी उत्तमनगर परिसरात रस्त्यावरील येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना तसेच महिलांना शिवीगाळ सुरू करीत धुडगूस घातला.
सिडकोतील उत्तमनगर ते पवननगर दरम्यान टवाळखोरांनी जोरदार गाडी चालवीत नागरिकांना शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळातच राजरत्ननगर येथे दळण घेऊन घरी जात असलेले हर्षवर्धन ऊर्फ स्वप्निल चंद्रकांत पंगे यांना या दोन तरुणांनी विनाकारण बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राजरत्ननगर परिसरात पंगे यांना मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी अशा अपप्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी धूडगूस घालणाऱ्या टवाळखोरांचा शोध सुरू केला आहे.