Chimukla killed and his father injured in a head-on collision | भरधाव मोटारीच्या धडकेत चिमुकला ठार अन् वडील जखमी

भरधाव मोटारीच्या धडकेत चिमुकला ठार अन् वडील जखमी

ठळक मुद्देया धडकेत विनायक रस्त्यावर कोसळून गंभीररीत्या जखमी

नाशिक : आपल्या वडिलांचा हात धरून मुंबईनाका येथून रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या चारवर्षीय चिमुकल्याला मुंबईकडून भरधाव आलेल्या इनोव्हा कारचालकाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गणेश बापुसाहेब पवार (रा. दत्तमंदिर चौक, द्वारका) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचे वडील गणेश पवारदेखील जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मुंबईनाका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी (दि.८) दुपारी ३ वाजेच्या सुमारास बापूसाहेब पवार हे मुलगा गणेशला घेऊन मुंबईनाका सर्कलजवळील रस्ता ओलांडत होते. याचवेळी मुंबईबाजूने द्वारकेकडे भरधाव जाणारी इनोव्हा कारने (एम.एच.४८ पी. ३१३५) त्यांना जोरदार धडक दिली. सुदैवाने या धडकेत बापूसाहेब बचावले; मात्र त्यांच्या चार वर्षीय मुलाचा उपचार सुरू असातना रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळी न थांबत वाहन घेऊन फरार झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना गंगापूररोडवरील सोमेश्वर देवस्थान परिसरात घडली. गंगापूर गावातील रहिवासी विनायक आनंदा ब्राह्मणे (५८) हे त्यांच्या मुलासाठी जेवणाचा डबा घेऊन सायकलवरून देवस्थानाकडे शनिवारी (दि.८) रात्री नऊ वाजेच्या सुमारास मार्गस्थ होत होते. यावेळी भरधाव जाणाऱ्या दुचाकीचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीवरील (एम.एच.१५ बीजी ४०५०) चालकाने त्यांच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत विनायक रस्त्यावर कोसळून गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना तत्काळ नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Chimukla killed and his father injured in a head-on collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.