जन्मदात्रीनेच दिले चिमुकलीला चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:58 IST2018-11-26T00:58:13+5:302018-11-26T00:58:40+5:30
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीच्या पायावर तिची जन्मदाती आई व प्रियकराने लोखंडी सळईने मांडी, पोटरी व पायावर चटके देऊन दुखापत केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे़

जन्मदात्रीनेच दिले चिमुकलीला चटके
नाशिक : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीच्या पायावर तिची जन्मदाती आई व प्रियकराने लोखंडी सळईने मांडी, पोटरी व पायावर चटके देऊन दुखापत केल्याची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे़ गंगापूररोडवरील दत्तनगर परिसरात ही घटना घडलेल्या या प्रकाराबाबत मुलीची आई व तिच्या प्रियकराविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, तपासासाठी हा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एऩ जे़ कंडारे यांनी दिली.
विजय रामचंद्र डिंगोरे (३४, रा़ मोखाडा, जि़ पालघर) यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या पत्नीचे त्यांच्याच नात्यातील संशयित हरी बाबू गायकवाड सोबत अनैतिक संबंध होते. दोन महिन्यांपूर्वी हे दोघेही घर सोडून पसार झाले व सोबत पाच वर्षांची मुलगी संस्कृतीलाही सोबत नेले़ होते. दत्तनगर परिसरात हे दोघे भाडेतत्त्वावर राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली व ते संस्कृतीला सोबत घेऊन गेले़ संस्कृतीला दुखापत झाली असून, तिची आई व हरी गायकवाड या दोघांवर बाल न्याय कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरचा गुन्हा शहरात घडलेला असल्याने गंगापूर पोलिसांत वर्ग करण्यात आला आहे. प्रेमात अडसर ठरत असलेल्या पाच वर्षीय संस्कृती हीस तिची जन्मदात्री आई व तिचा प्रियकर हरी गायकवाड हे दोघेही मारहाण करीत असत़ तसेच १२ व १३ सप्टेंबर २०१८ रोजी लोखंडी गरम सळईने पायांवर, मांड्यावर, गुडघ्यांवर चटके दिले़