नाशिक : जीएसटी येऊन तीन वर्षे झाली परंतु त्यातील समस्या सुटलेल्या नाही. त्यामुळे वारंवार व्यत्यय आणि व्यापारी आणि कर सल्लागार वेठीस धरले जात असून करासंदर्भातील ही यंत्रणा सुलभ करावी, अशी मागणी नाशिक कर सल्लागार समिती आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉॅमर्सच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि२९) जीएसटी कार्यालयात सीजीएसटीचे आयुक्त अविनाश शेटे, एसजीएसटीचे सह आयुक्त अजय बोंडे, अतिरिक्त आयुक्त सुभाष टिळेकर यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, कर सल्लागार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चव्हाण, नाशिकचे अध्यक्ष सुनील देशमुख तसेच राजेंद्र बकरे, निवृत्ती मेारे, सनदी लेखापाल रवी राठी, सेामाणी,हेमंत डागा, प्रकाश विसपुते, अक्षय सोनजे यांनी हे निवेदन दिले. जीएसटी पोर्टल अपलोड करताना येणाऱ्या अडचणी यात मांडण्यात आल्या असून अनेकदा किरकोळ कारणासाठी नोटिसा देणे, तसेच अेाटीपी अवघ्या दहा मिनिटांसाठी असणे, अखेरच्या दिवसात पोर्टल हंँग होणे असे अनेक प्रकार होत असल्याने व्यापारी आणि कर सल्लागार त्रस्त झाले आहेत. त्यामुळे केंद्रीय अर्थंमंत्र्यांपर्यंत समस्या पोहोचवून त्यात सुधारणा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जीएसटीतील अडचणी सोडण्यासाठी चेंबरने घातले अधिकाऱ्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 01:24 IST