बुध्दपौर्णिमेला राज्यभरात होणारी वन्यप्राणी गणना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 19:36 IST2020-04-28T19:28:39+5:302020-04-28T19:36:52+5:30

यावर्षी कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे परस्परांमधील ‘डिस्टन्स’ राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. परिणामी वन्यप्राणी गणनेदरम्यान एका मचाणावर एकापेक्षा अधिक निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमींची संख्या असते.

Cancellation of wildlife count on Buddhapurnima | बुध्दपौर्णिमेला राज्यभरात होणारी वन्यप्राणी गणना रद्द

बुध्दपौर्णिमेला राज्यभरात होणारी वन्यप्राणी गणना रद्द

ठळक मुद्देप्रधान मुख्य वनसंरक्षकांचा निर्णयकोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता खबरदारी

नाशिक : बुध्द पौर्णिमेच्या चांदण्यारात्री लख्ख प्रकाशात दरवर्षी वन, वन्यजीव विभागाकडून राज्यभरात अभयारण्ये, राखीव वनक्षेत्रांच्या परिसरात करण्यात येणारी वन्यप्राणी गणना यावर्षी स्थगित करण्याचा निर्णय राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा विभागीय वनाधिकारी एस.बी.भलावी यांनी जाहीर केला आहे. याबाबतचे पत्र अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांसह सर्व व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक, तथा विविध जिल्ह्यांचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षकांना पाठविण्यात आले आहे. यामुळे यंदा राज्यभरात कोठेही कोणत्याही प्रजातीच्या वन्यप्राण्यांची गणना होऊ शकणार नाही.

कोरोना आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय वन्यजीव विभागाकडून घेण्यात आला आहे.
बुध्दपौर्णिमेला वार्षिक वन्यप्राणी गणना राज्यभरात वन्यजीव विभागासह वनविभागाकडून (प्रादेशिक) केली जाते. यावर्षी मात्र कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे परस्परांमधील ‘डिस्टन्स’ राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. परिणामी वन्यप्राणी गणनेदरम्यान एका मचाणावर एकापेक्षा अधिक निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमींची संख्या असते. त्यामुळे कोरोना आजाराच्या फैलावाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कोरोना आजारामुळे विविध जिल्ह्यांच्या सीमाबंदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यांमधील अभयारण्यांमध्ये निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी अभ्यासक पोहचू शकणार नाही, अशा सर्व बाबी लक्षात घेता यंदाची बुध्दपौर्णिमेला होणारी वार्षिक वन्यप्राणी गणना स्थगित करण्यात आल्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी जाहीर केले आहे.

बुध्दपौर्णिमेला चांदण्या रात्रीचा प्रकाश हा अन्य पौर्णिमेच्या रात्रींपेक्षा अधिक प्रखर असतो. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पाणस्थळे, अभयारण्यांमधील पाणवठ्यांवर तृष्णा भागविण्यासाठी येणारे वन्यप्राणी सहज टिपता येणे शक्य होते. कुठल्या प्रजातीचे वन्यजीव रात्रीतून पाणवठ्यांजवळ किंवा निरिक्षण मनोरे अथवा मचाणजवळून मार्गस्थ झाले तेदेखील सहजरित्या नजरेस पडते. यासाठी कुठल्याहीप्रकाणे कृत्रिम प्रकाशयोजनेची आवश्यकता भासत नाही. तसेच चांदण्या रात्रीचा प्रकाश नैसर्गिक असल्यामुळे वन्यजीवदेखील फारसे या प्रकाशाला घाबरत नाही. त्यामुळे दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वार्षिक वन्यप्राणी गणना बुध्दपौर्णिमेला आयोजित केली जाते.


 

Web Title: Cancellation of wildlife count on Buddhapurnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.