मालेगावी वर्धमान नगरात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:25 IST2019-02-12T00:20:51+5:302019-02-12T00:25:56+5:30
मालेगाव येथील वर्धमाननगर भागात प्रकाश कांतीलाल शहा यांच्याकडे घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला.

मालेगावी वर्धमान नगरात घरफोडी
मालेगाव : येथील वर्धमाननगर भागात प्रकाश कांतीलाल शहा यांच्याकडे घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी छावणी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील मध्यवस्तीत असलेले वर्धमाननगरात अज्ञात चोरट्यांनी प्रकाश कांतीलाल शहा यांच्या राहत्या घरी मागच्या बाजूने प्रवेश केला. घरातील रोख रक्कम एक लाख ८९ हजार रुपये, चांदीची भांडी, सोन्याचे दागिने असा ऐवज लांबविला. रविवारी (दि.१०) मध्यरात्रीनंतर घरातील लोक साखरझोपेत असताना चोरट्यांनी ही चोरी केली. सोमवारी सकाळी घरफोडीचा हा प्रकार निदर्शनास आला. प्रकाश शहा यांनी छावणी पोलिसांत फिर्याद दिली.
शहा यांचा वर्धमान नगरात तृप्ती नामक बंगला आहे. सोमवारी सकाळी ते फिरण्यासाठी लागणारे कपडे घेण्यासाठी बेडरुममध्ये गेले असता त्यांना कपाटे उघडी व तोडलेली असल्याचे आढळून आले. शहा कुटुंबियांनी चोरीला गेलेल्या ऐवजांची यादी केली असता रोख रक्कमेसह, चांदीची भांडी, शिक्के, सोन्याचे दागिने अशा चौदा प्रकारच्या किंमती वस्तु लंपास झाल्याचे लक्षात आले. छावणी पोलीसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.