बैल झाले महाग, सुयोग्य जोड्या मिळणे अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 00:19 IST2021-05-22T20:14:42+5:302021-05-23T00:19:54+5:30
देवगांव : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतीतील कामांची लगबग वाढली आहे. पारंपरिक पद्धतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता असते. सध्या लॉकडाऊनमुळे बैलजोड्यांची खरेदी-विक्री बाजार बंद आहे. काही ठिकाणी बैलांचे दर दुपटीने वाढल्याने तसेच योग्य बैलजोड्या सहजपणे मिळत नसल्याने एक वेगळाच पेच निर्माण झाला आहे.

बैल झाले महाग, सुयोग्य जोड्या मिळणे अवघड
देवगांव : खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतीतील कामांची लगबग वाढली आहे. पारंपरिक पद्धतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता असते. सध्या लॉकडाऊनमुळे बैलजोड्यांची खरेदी-विक्री बाजार बंद आहे. काही ठिकाणी बैलांचे दर दुपटीने वाढल्याने तसेच योग्य बैलजोड्या सहजपणे मिळत नसल्याने एक वेगळाच पेच निर्माण झाला आहे.
पुढील महिन्यात खरीप हंगाम सुरू होत आहे. हंगामापूर्वी मशागतीच्या कामांसाठी बैलांची मोठी गरज असते. यासाठी शेतकरी गुढीपाडव्यानंतर बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करतात. यंदा गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व प्रकारचे बाजार बंद आहेत. याचा फटका प्रामुख्याने जनावरांच्या बाजाराला अधिक बसला आहे. बैलांची आवश्यकता असलेले शेतकरी बाजार उपलब्ध नसल्याने वैयक्तिक स्तरावर शोध घेत आहेत. चांगल्या दर्जाचे, नामवंत जातीचे बैल सहजपणे मिळणे कठीण झालेले आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर बैलजोड्यांचे दर सव्वा ते दीडपट वाढले आहेत. गेल्यावर्षी ४० हजारात मिळणारी जोडी ६० ते ६५ हजार रुपये देऊनही मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. या भागात प्रत्येक तालुक्यात एक ते दोन मोठे जनावर बाजार आहेत.
आठवड्याला भरणाऱ्या या बाजारांमध्ये वर्षभर विविध जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. साधारणतः एप्रिल महिन्यापासून पेरणीपर्यंत बैलजोड्यांची विक्री अधिक होत असते. सध्या बाजारच बंद असल्याने, या बाजारांशी निगडीत इतरही व्यवहार ठप्प झालेले आहेत.
मशागतीत अडचणी
यंदाच्या हंगामात शेतीच्या कामांना परवानगी दिलेली असली तरी अनेक ठिकाणी ट्रॅक्टरला डिझेल मिळण्यात अडचणी आहेत. वेगाने मशागत होण्यासाठी ट्रॅक्टरची मागणी वाढल्याने यंदा मशागतीच्या दरांमध्ये १० ते १५ टक्के वाढ करण्यात आलेली आहे. छोटे शेतकरी बैलजोड्यांच्या साह्याने शेतीतील कामे करतात. बाजारांअभावी बैलजोड्या मिळत नसल्याने त्याचा परिणाम होत आहे.
बाजार बंदचे परिणाम...
▪️चांगले बैल मिळणे कठीण
▪️बैलजोड्यांचे दर दीड ते दुप्पट वाढले
▪️मध्यस्थांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक
▪️बैलजोड्या शोधण्यासाठी धावपळ
▪️बाजार बंदमुळे बाजार समित्यांचे उत्पन्न बुडाले
▪️बैलजोडीचा दर साधारणतः ४० हजारांपासून सुरू
▪️जास्तीत जास्त ८० हजार ते १ लाखापर्यंत दर
▪️जनावरांच्या बाजारांवर अवलंबून असलेले व्यवसायही ठप्प.