Nashik Crime news: चार महिन्यांपूर्वी मुंबई येथील घरी कुटुंबीयांसह उन्हाळी सुटीत दीर निघून गेल्याने त्याचा गैरफायदा घेत त्यांच्या भावजयीने मैत्रिणीच्या मदतीने तब्बल ५९ लाख ८५ हजार ३०० रुपयांचा सोन्या-चांदीचे दागिने लांबविले होते. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस या गुन्ह्याचा तपास करत असताना संशयित आरोपी कांकरिया आणि तिची मैत्रीण अमरिता ठक्कर यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून ४६ लाख रुपये किमतीचे ५२ तोळ्यांचे दागिने हस्तगत करण्यासयश आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादी मनोज कांकरिया यांच्या घरातून सुमारे ५९ लाख ८५ हजार ३०० रुपये किमतीचा मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक संतोष नरुटे, सहायक निरीक्षक सुधीर पाटील, गुन्हेशोध पथकाचे उपनिरीक्षक समद बेग, रोहिदास सोनार, आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पोलिस तांत्रिक विश्लेषण सुरू ठेवत माग काढत होते.
सापळा रचला अन् पूजाला घेतलं ताब्यात
समद बेग यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संशयित पुजा ही मुंबई येथे येणार असल्याचे समजले. नरुटे यांनी तातडीने महिला पोलिसांसह पथक तयार करून मुंबईला रवाना केले. तेथे सापळा रचून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिला विश्वासात घेत पोलिस कोठडीत अधिक चौकशी केली असता तिने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी ठक्कर हिचा शोध घेण्यास सुरुवात करून, गुजरातमधील अहमदाबाद येथे जाऊन, सापळा रचून तिला ताब्यात घेतले. या दोघींना न्यायालयाने काही दिवसांपूर्वी जामिनावर सोडले आहे. या प्रकरणी बेग हे अधिक तपास करीत आहेत.
शोध घेण्यात अडचणी
घटनेच्या जागी कुठल्याही प्रकारची तोडफोड केलेली आढळून आली नव्हती. घरातील सामान अस्ताव्यस्त होते. यामुळे गुन्हा हा परिचित व्यक्तीने केल्याची पोलिसांना खात्री पटली.
त्या दिशेने तपासाला गती दिली असता फिर्यादी कांकरिया यांची नात्याने भावजय असलेल्या संशयित पूजा प्रसाद कांकरिया (रा.अंधेरी) हिने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली; मात्र कांकरिया हिने संपर्कसाधने बदलून टाकल्याने तिने अस्तित्व लपविल्याने तिचा शोध घेण्यास अडचणी येत होत्या.