महावितरणच्या दोघा सहायक अभियंत्यांविरूध्द लाचखोरीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 19:48 IST2020-02-05T19:48:28+5:302020-02-05T19:48:41+5:30
तक्रारदाराच्या एका प्रकल्पाच्याठिकाणी वीजवापराकरिता ९५ वीजमीटर व डीटीएस३१५ केव्ही ट्रान्सफार्मर बसवून विद्युत पुरवठा देण्यासाठीचा अहवाल मंजुरीकरीता तक्रारदाराकडे श्रृंगारे यांनी १लाख २० हजार रूपये, व खरगे यांनी ४५ हजारांची मागणी केली होती.

महावितरणच्या दोघा सहायक अभियंत्यांविरूध्द लाचखोरीचा गुन्हा
नाशिक : ३१५केव्हीचा ट्रान्सफार्मर व ९५ वीजमीटर बसवून देण्याच्या बदल्यात एका ठेकेदाराकडून महावितरण कंपनीच्या द्वारका कार्यालयातील सहायक अभियंता कृष्णराव अरविंद श्रृंगारे, व भारतनगर येथील मंगेश प्रभाकर खरगे या दोघांनी २०१९ साली तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे सापळापुर्व पडताळणीत सिध्द झाल्याने अभियंत्यांविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराच्या एका प्रकल्पाच्याठिकाणी वीजवापराकरिता ९५ वीजमीटर व डीटीएस३१५ केव्ही ट्रान्सफार्मर बसवून विद्युत पुरवठा देण्यासाठीचा अहवाल मंजुरीकरीता तक्रारदाराकडे श्रृंगारे यांनी १लाख २० हजार रूपये, व खरगे यांनी ४५ हजारांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. यावरून विभागाने तक्रार नोंदवून घेत १९ डिसेंबर २०१९ साली सापळापुर्व पडताळणी करत पंचांसमक्ष लाचेची मागणी करत ती रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भद्रकाली पोलीस ठाण्यात या दोघा सहायक अभियंत्यांविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.