Brain surgery to be done at Nashik District Hospital! | नाशिक जिल्हा रुग्णालयात होणार मेंदूवर शस्त्रक्रिया!
नाशिक जिल्हा रुग्णालयात होणार मेंदूवर शस्त्रक्रिया!

ठळक मुद्देकंत्राटी पद्धतीने भरती : विशेष तज्ज्ञांची लवकरच नियुक्तीनवजात शिशु, किडनी रोग तज्ज्ञांचीही नेमणूक करण्यात येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राष्टÑीय आरोग्य मिशन अंतर्गत राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी व विशेष तज्ज्ञांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता दिल्याने नाशिक जिल्ह्यात थेट मुलाखतीद्वारे विशेष तज्ज्ञांच्या नेमणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, या भरतीचे वैशिष्टे म्हणजे जिल्हा रुग्णालयाला पहिल्यांदाच मेंदूविकार तज्ज्ञ मिळणार आहे. या शिवाय नवजात शिशु, किडनी रोग तज्ज्ञांचीही नेमणूक करण्यात येणार असल्याने आता जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.


जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून मेंदूविकार तज्ज्ञ नसल्यामुळे अपघातात जखमी होऊन डोक्याला मार लागलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे रुग्णालयात सीटी स्कॅन यंत्रणा कार्यान्वित असूनही रुग्णाला मात्र त्याच्या तपासणीतून उपचारासाठी फायदा होत नव्हता. त्यासाठी मेंदूवरील उपचारासाठी एकतर रुग्णाला खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत किंवा उपचाराअभावी मृत्यूला कवटाळावे लागल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. आता त्यातून रुग्णांची सुटका होणार असून, राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत दोन आठवड्यांपूर्वी वैद्यकीय क्षेत्रातील विविध विशेष तज्ज्ञांच्या सुमारे ८० पदांच्या कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून थेट मुलाखतींसाठी बोलविले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पदांसाठी पात्र ठरलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या असता, त्यात एक मेंदूविकार तज्ज्ञ, एक कार्डिओलॉजिस्ट, फिजिशियन, अकरा स्त्रीरोगतज्ज्ञ, सहा बालरोगतज्ज्ञ, सात भूलतज्ज्ञ, किडणी रोगतज्ज्ञ, नवजात शिशुतज्ज्ञ, सूक्ष्म जीवशस्त्र तज्ज्ञ, एक सर्जन, आठ वैद्यकीय अधिकारी अशी अनेक पदे भरण्यात आली आहेत. या वैद्यकीय अधिकाऱ्यांना लवकरच नियुक्ती देण्यात येणार असून, यातील तज्ज्ञांची जिल्हा शासकीय रुग्णालयाबरोबरच ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गरजेनुसार नियुक्त्या देण्यात येणार आहे.


Web Title: Brain surgery to be done at Nashik District Hospital!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.