‘ब्रह्मगिरी’ला टपाल पाकिटावर स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:13 IST2018-10-14T23:56:22+5:302018-10-15T00:13:54+5:30
गोदावरी नदीचे उगमस्थान व धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या नाशिकच्या वैभवापैकी एक त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला प्रथमच टपालाच्या पाकिटावर स्थान मिळाले आहे. ‘ब्रह्मगिरी’चे छायाचित्र असलेले विशेष डिझाइन केलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण येत्या ‘नापेक्स-२०१८’ टपाल तिकिटांच्या प्रदर्शनात केले जाणार आहे.

‘ब्रह्मगिरी’ला टपाल पाकिटावर स्थान
नाशिक : गोदावरी नदीचे उगमस्थान व धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या नाशिकच्या वैभवापैकी एक त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला प्रथमच टपालाच्या पाकिटावर स्थान मिळाले आहे. ‘ब्रह्मगिरी’चे छायाचित्र असलेले विशेष डिझाइन केलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण येत्या ‘नापेक्स-२०१८’ टपाल तिकिटांच्या प्रदर्शनात केले जाणार आहे.
टपाल विभागाकडून जिल्हास्तरीय टपाल तिकिटांचे प्रदर्शन ‘नापेक्स-२०१८’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रवर डाक अधीक्षक पी. जे. काखंडकी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनात दोन विशेष टपाल पाकिटांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यामध्ये ब्रह्मगिरी पर्वत व समाधी सम्राट श्री १०८ सुधर्मसागर महाराज यांचा समावेश आहे. येत्या शनिवारपासून (दि.२०) शहरात दोनदिवसीय टपाल तिकिटांच्या प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे. हे प्रदर्शन सर्व वयोगटांसाठी विनामूल्य असल्याचे काखंडकी यांनी यावेळी सांगितले. नाशिककरांना यावर्षी देश-विदेशातील विविध टपाल तिकिटांचा संग्रह पाहता येणार आहे. थोर व्यक्ती, जागतिक भूगोल, विविध देशांचा इतिहास, संस्कृती, नैसर्गिक साधनसंपत्ती, जैवविविधतेची माहिती प्रदर्शनातून होणार आहे. यावेळी वरिष्ठ डाकपाल मोहन अहिरराव, सर्कल स्टॅम्प डेपोचे अधीक्षक संजय फडके, सहायक अधीक्षक पंकज कुलकर्णी आदी उपस्थित होते.
‘छंदांचा राजा’ व ‘राजांचा छंद’
टपाल तिकीट संग्रह हा जगातील सर्वात लोकप्रिय छंद म्हणून ओळखला जातो. या छंदास ‘छंदांचा राजा’ व ‘राजांचा छंद’ असे म्हटले जाते. हा एकमेव छंद असा आहे की, तो जोपासताना होणारा खर्च वाया जात नाही तर त्याचे मूल्य वाढत असते. हा छंद आबालवृद्ध जोपसतात. नाशिक जिल्ह्यातून सुमारे ४०हून अधिक तिकीट संग्रह करणारे छंदवेडे या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. हे प्रदर्शन स्पर्धात्मक असून विजेत्यांना सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.