बालकाने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 17:55 IST2019-12-10T17:54:02+5:302019-12-10T17:55:06+5:30
सिन्नर : तालुक्यातील घोटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिसरीत शिकणाऱ्या यश लक्ष्मण कडवे या विद्यार्थ्याने सापडलेले साडे सहा हजार रुपये संबंधितास परत करुन समाजापुढे प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे.

बालकाने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन !
यश कडवे हा विद्यार्थी दूध आणण्यासाठी दूध संकलन केंद्रावर गेला असता पारेगाव येथील रहिवासी रामनाथ नामदेव गडाख हे रस्त्याने चालताना खिशातून मोबाईल काढत असताना त्यांचे साडेसहा हजार रुपये खिशातून खाली पडले. ही बाब त्यांच्या लक्षात न आल्याने ते सरळ पुढे निघून गेले. यश कडवे या विद्यार्थ्याने लांबून पाहिले असता त्याने धावत जाऊन पैसे उचलले व गडाख यांना आवाज देवू लागला. त्याचा आवाज त्यांच्या पर्यंत न पोहचल्याने ते पैसे कुणाकडेही न देता त्यांच्या मागे धावत जाऊन स्वत: त्यांना दिले.संध्याकाळी भिशीसाठी जमवलेले पैसे विद्यार्थ्याच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाल्याने त्यांनाही हायसे वाटले. व त्याला बक्षीस देवू केले असता त्याने ते नम्रपणे नाकारले. गडाख यांनी त्याला खाऊ देत शिक्षणासाठी त्याला मदत करणार असल्याचे सांगितले. त्याची आई सौ. सुनीता कडवे या शाळेत शालेय पोषण आहार शिजवण्याचे काम अत्यंत सेवाभावी वृत्तीने करत असून हाच संस्कार मुलातही रुजवला आहे. वडील घोटेवाडी गावातच केश कर्तनालय चालवतात. यश याच्या प्रामाणिकपणाबद्दल शिक्षक व ग्रामस्थांनी यश व त्याची आई दोघांचाही शाळेत सन्मान केला. याप्रसंगी भाऊराव वैराळ, सुभाष घोटेकर, बाळनाथ घोटेकर, अनिल यादव, संदिप वैराळ, सुनील घोटेकर, गोरक्षनाथ घोटेकर यांच्यासह ग्रामस्थ, पालक व मुख्याध्यापक संतोष झावरे शिक्षक सुरेश दिघे, सुरेखा शेळके, पोपट नागरगोजे उपस्थित होते.