नाशिक : येवला तालुक्यातील सावरगाव येथे विहिरीचे काम करीत असताना विहिरीत पडून एकाचा, तर निफाड तालुक्यातील रौळस येथील मुलाचा कादवा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मौजे सावरगाव येथील रावबा किसन कुशारे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. सदर विहिरीवर काम करत असताना सुरेंद्र नाईक या मजुराचा मृत्यू झाला. सदर व्यक्ती कुचामन, जि. नागूर, राजस्थान येथील मूळ रहिवासी आहे. दुसरी घटना रौळस (ता. निफाड) येथे घडली. रौळस येथील प्रल्हाद लक्ष्मण शिंदे यांचा मुलगा जनार्दन तथा निरंजन शिंदे (वय १३) हा कादवा नदीत पोहायला गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दोन्ही घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पाण्यात पडून जिल्ह्यात दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:38 IST