अंधांचे झाले वाचन सुलभ
By Admin | Updated: February 1, 2017 00:54 IST2017-02-01T00:54:14+5:302017-02-01T00:54:29+5:30
बोलके वाचनालय : डेझी तंत्रज्ञानासह एमपीथ्री, ई-बुक पुस्तकांचा खजिना

अंधांचे झाले वाचन सुलभ
भाग्यश्री मुळे : नाशिक
वाचनाची आवड केवळ डोळसांनाच असते असे नाही, तर अंधानाही असते. त्यांच्यासाठी खास ब्रेल लिपीतील पुस्तके तयार होत असतात. त्यांच्यासाठी नाशिकमध्ये खास बोलके वाचनालय साकारण्यात आले आहे. पहिले बोलके वाचनालय ‘ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड अॅण्ड डिसॅबल्ड’ या संस्थेतर्फे सुरूझाले असून, यामुळे आता अंध व्यक्तींना हवे ते पुस्तक मिळवून वाचणे सोपे झाले आहे. या वाचनालयात डेझी म्हणजे डिजिटल अॅक्सिसेबल इन्फॉर्मेशन सिस्टीम, एमपीथ्री बुक, ई-बुक या प्रकारची दहावी ते पदव्युत्तर, स्पर्धा परीक्षा, साहित्य, चालू घडामोडी आदि विविध अभ्यासक्रमांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभ्यासाबरोबरच कथा, कादंबऱ्या, काव्यसंग्रह, वैज्ञानिक शास्त्र, नियतकालिक आदि पुस्तकेही इच्छुकांना मिळणार आहेत. ही पुस्तके संगणक किंवा मोबाइलमध्ये स्क्रीनरिड्स म्हणजे जॉज (जेएडब्ल्यूएस), एनव्हीडीए टॉक्स आणि टॉक बॅक यांसारख्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने वाचता येऊ शकतात. या वाचनालयात देशभरातील रेकॉर्डे क्रमिक पुस्तके सीडी, एमपीथ्रीच्या स्वरूपात जमा करण्यात आली असून, स्वयंसेवकांच्या मदतीतून गरजेनुसार आणखी पुस्तके रेकॉर्ड करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. हे वाचनालय सुरू करण्यामागील प्रेरणेबद्दल सांगताना वाचनालयाचे अध्यक्ष विकास शेजवळ आणि सचिव रामदास जगताप म्हणाले की, शिक्षण घेत असताना एखाद्याला ‘वाचून दाखव रे’ अशी विनवणी वारंवार करावी लागायची. गप्पा मारण्यासाठी कितीही वेळ बसणारे वाचून दाखव म्हणताच ‘आलोच’ म्हणून निघून जायचे. अंधांना अशा प्रकारे कुणाची विनवणी करण्याची वेळ येऊ नये म्हणून तीन वर्षांपासून अशा प्रकारचे वाचनालय सुरू करण्याची संकल्पना मनात घोळत होती. याच दरम्यान संस्थेला ‘नाशिक रन’ संस्थेकडून १० नवीन संगणक मिळाले. त्यामुळे तर वाचनालय सुरू करण्याचा विचार अधिक पक्का झाला. अॅड. नवीन चोमल, हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील आदिंच्या मदतीने आणि दात्यांच्या आर्थिक पाठिंब्याने हे वाचनालय आकार घेऊ शकले. सध्या हे वाचनालय हरिवंदन सोसायटी, पारिजातनगर, जुना सायखेडारोड, जेलरोड, नाशिकरोड येथे सुरूअसून वाचनालयातून इच्छुक अंध बांधव प्रत्यक्ष येऊन, पोस्टाद्वारे, ईमेलद्वारे हवे ते पुस्तक मागवू शकता. नि:शुल्क तत्त्वावर ही पुस्तके पुरविली जात असून, उद्घाटनापासून राज्यभरातील अंध बांधवांचा मोठा प्रतिसाद वाचनालयास लाभत आहे. नवनवीन पुस्तके रेकॉर्ड करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.