भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 14:36 IST2025-12-20T14:34:29+5:302025-12-20T14:36:20+5:30
Rahul Dhikale Devyani Pharande: महापालिका निवडणूक जाहीर होताच भाजपने नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख पदावरून आमदार राहुल ढिकले यांना हटवले. त्यानंतर नाराजीची लाट येताच भूमिका बदलली.

भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
Nashik Municipal Elections: भाजपने निवडणूक जाहीर झाल्यानंतर नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्याकडील जबाबदारी नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यावर दिली. भाजपने ऐनवेळी हा निर्णय घेतल्यान ढिकले यांचे समर्थक नाराज झाले. त्यामुळे भाजपने २४ तासांतच यू-टर्न घेत, यावर खुलासा केला.
नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून काम करणाऱ्या आमदार राहुल ढिकले यांना भाजपने हटवले. ही जबाबदारी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे देण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी फरांदे यांची नियुक्ती केली. पण, या बदलामुळे आमदार ढिकले यांचे समर्थक नाराज झाले.
...म्हणून निवडणूकप्रमुख फरांदेंवरही जबाबदारी
भाजपचे शहरांध्यक्ष सुनील केदार याबद्दल बोलताना म्हणाले की, "निवडणूक व्यवस्थेचा भाग म्हणून दोघांवरही जबाबदारी दिली आहे."
कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन नाशिकमधील पक्षाने केलेल्या नव्या नियुक्तीबद्दल म्हणाले की, "नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख बदलल्याची मला माहिती नाही. निवडणूक प्रमुख कोणी झाले असेल, तर तेच उमेदवारी अंतिम करतील असे होत नाही", असा खुलासा महाजन यांनी केला.
नाशिक दौऱ्यात माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, "पक्षातील वरिष्ठ म्हणून देवयानी फरांदेंकडे जबाबदारी देण्यात आली असेल. पक्षात एक व्यवस्था असते. यादी तयार करणे, ती मुंबईला पाठवणे यासाठीची ही व्यवस्था असते."
राहुल ढिकले यांच्याबद्दल पक्षाने निर्णय घेतल्याने त्यांचे समर्थक नाराज झाल्याने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षातील प्रमुख नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, शहराध्यक्षांनी केलेल्या दावानंतर काही प्रश्नही उपस्थित होत आहे.
महापालिका निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दोघांवरही दिलेली होती, तर आमदार फरांदे यांच्या नियुक्तीपत्रात त्याबद्दलचा उल्लेख का नाही, या चर्चेलाही तोंड फुटले आहे.