भाजपने राखला महापालिकेचा गड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 01:09 AM2019-11-23T01:09:23+5:302019-11-23T01:10:00+5:30

भाजपतील फाटाफूट, विरोधकांची महाशिवआघाडीची मोट यानंतरही बहुमतासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या निवडणुकीत अखेर भाजपची सरशी झाली.

 BJP maintains municipal corporation | भाजपने राखला महापालिकेचा गड

भाजपने राखला महापालिकेचा गड

Next

नाशिक : भाजपतील फाटाफूट, विरोधकांची महाशिवआघाडीची मोट यानंतरही बहुमतासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या निवडणुकीत अखेर भाजपची सरशी झाली. मनसेला आपल्याकडे वळवण्यात आणि कॉँग्रेस पक्षाला फोडण्यात भाजप सेनेवर भारी पडल्याने नाशिकच्या सोळाव्या महापौरपदी ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदी भिकूबाई बागुल यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शुक्रवारी (दि.२२) सकाळी झालेल्या निवडणुकीत बहुमताचा आकडा न जुळल्याने शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्षांनी माघार घेत भाजपच्या विजयाला मोकळी वाट करून दिली. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. तत्पूर्वी सकाळी १० वाजेच्या सुमारास निवडणुकीसाठी नगरसेवकांचे आगमन सुरू झाले. बदलत्या राजकीय वातावरणाचे भाव त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत आहे. सकाळी सर्व प्रथम कॉँग्रेसचे नगरसेवक दाखल झाले. त्यानंतर भाजपचे बंडखोर दाखल झाले. त्यानंतर राष्टÑवादी, मनसे आणि शेवटी भाजपचे नगरसेवक दाखल झाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली त्यावेळी दाखल दहा जणांचे अर्जांची छाननी प्रथम करण्यात आली. त्यानंतर माघारीसाठी पंधरा मिनिटांचा वेळ देण्यात आला. यावेळेत अर्ज दाखल करणाºया सर्वांनीच माघार घेतली. त्यामुळे निर्णय घोेषित होण्याआधीच सर्वांनी कुलकर्णी यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

त्यापाठोपाठ उपमहापौरपदाची निवडणूकदेखील मांढरे यांच्या अधिपत्याखालीच पार पडली. सर्व उमेदवारी अर्ज त्यांनी वैध ठरविल्यानंतर माघारीसाठी देण्यात आलेल्या मुदतीत अकरापैकी दहा नगरसेवकांनी माघार घेतली आणि त्यानंतर भिकूबाई बागुल यांची निवड झाल्याचे जिल्हाधिकाºयांनी घोषित केली. या दोन्ही निवडीनंतर भाजपच्या नगरसेवकांनी एकच जल्लोष केला. नवनिर्वाचित महापौर कुलकर्णी आणि उपमहापौर भिकूबाई बागुल यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली. पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, अ‍ॅड. राहुल आहेर, माजी शहराध्यक्ष विजय साने, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, शहराध्यक्ष गिरीश पालवे, लघुउद्योग आघाडीचे प्रदीप पेशकर यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीची अधिकृत घोषणा होताच महापौर बंगल्यासमोर एकच जल्लोष झाला. माजी पालकमंत्री गिरीश महाजन, उत्तर महाराष्टÑ संघटन मंत्री किशोर काळकर यांनीही त्याठिकाणी येऊन जल्लोष केला.
राज्यातील शिवसेनेच्या सत्ता संघर्षानंतर नाशिक महापालिकेतील सत्ता खालसा करण्यासाठी सुरू झालेल्या हालचालींमुळे भाजपची प्रतिष्ठापणाला लागली होती. महापालिकेत १२० नगरसेवक सध्या असून, भाजपचे ६५ बहुमतासाठी ६१ नगरसेवकांची गरज होती. त्यातच दहा ते बारा नगरसेवक हे माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक असल्याने ते फुटल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली होती. सत्ता समीकरणेसारखी बदलत होती. मध्यरात्री उशिरापर्यंत राजकीय पक्षांच्या बैठका सुरू होत्या. उमेदवारीचादेखील खल सुरू होता. त्यानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास भाजपकडून महापौरपदासाठी सतीश कुलकर्णी, तर उपमहापौरपदासाठी भिकूबाई बागुल या दोघा ज्येष्ठ नगरसेवकांची नावे निश्चित झाली. त्यानंतर शिवसेनेकडून अजय बोरस्ते यांचे महापौर, तर भाजप बंडखोर कमलेश बोडके यांची नावे निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. परंतु काही वेळात राजकारण फिरले आणि काँगे्रस महाआघाडीतून बाहेर पडल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे वातावरणच फिरले आणि शिवसेनेच्या माघारीची चर्चा सुरू झाली. एकूणच स्थिती बघता सर्वांनी माघार घेणेच पसंत केले.
अशा घडल्या नाट्यमय घडामोडी
मनसेच्या नगरसेवकांची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांना पक्षाच्या वतीने कळविण्यात येणार असल्याचा संदेश देण्यात आला. रात्री इगतपुरीजवळील एका हॉटेलात मनसेच्या काही नगरसेवकांचा मुक्काम होता. त्याचवेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अभिजित पानसे यांनी तेथे येऊन भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.
कॉँग्रेसने कोणाला पाठिंबा द्यावा यासाठी पक्षाचे निरीक्षक श्याम सनेर यांंनी चर्चा केली.
मध्यरात्री शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी राष्टÑवादीचे माजी खासदार समीर भुजबळ आणि काँग्रेसचे श्याम सनेर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन महाशिवआघाडीची खात्री करून घेतली.
इगतपुरीतील हॉटेलमध्ये रात्री दाखल झालेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेतली. त्यानंतर सत्ता समीकरणे जुळत नसल्याचे स्पष्ट झाले.
मध्यरात्री भाजपचा बंडखोरांशी संपर्क झाला त्यांना परिणामांची कल्पना देण्यात आली. त्यामुळे त्यातील अनेक जण रात्रीच भाजपकडे आले.
सकाळी ९ वाजता इगतपुरीतून भाजपचे नगरसेवक नाशिककडे निघाल्यानंतर त्यांना महापौरपदासाठी सतीश कुलकर्णी आणि उपमहापौरपदी भिकूबाई बागुल यांच्या उमेदवारीची कल्पना देण्यात आली.
साडेनऊ वाजेच्या सुमारास शिवसेनेच्या वतीने अजय बोरस्ते यांची महापौरपदासाठी, तर भाजप बंडखोर कमलेश बोडके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.
पावणेदहा वाजता कमलेश बोडके यांच्या उमेदवारी बदलाची चर्चा सुरू झाली. भाजपकडून भिकूबाई बागुल यांना उमेदवारी दिल्याने भाजप बंडखोर बागुल यांना मदत करणार सांगितले जाऊ लागले.
कॉँग्रेसने महाशिवआघाडीबरोबर न राहण्याचे सांगितल्याने शिवसेनेचे बहुमतांचे गणित फिस्कटले. त्यामुळे राष्टÑवादी आणि शिवसेना बहिष्कार घालणार असल्याच्या चर्चा सुरू.
१० वाजता कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे यांच्यासह कॉँग्रेस नगरसेवकांचे (डॉ. हेमलता पाटील वगळता) आगमन. सत्तेत वाटा न दिल्याने आता सभागृहातच भूमिका ठरविणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट.
दरवाजे बंद करण्याचे काम शिपायांचे, जिल्हाधिकाºयांनी सुनावले
निवडणुकीची वेळ ११ वाजेची असल्याने भाजपचे मोजकेच नगरसेवक सभागृहात असल्याचे बघून शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी निवडणूक अधिकाºयांना वेळ झाली कामकाज सुरू करा, असे सांगितले. मात्र मनगटी घड्याळाप्रमाणे नव्हे तर सभागृहातील घड्याळाप्रमाणे कामकाज होईल, असे सांगितले. त्यानंतर पुन्हा ११ वाजल्याने सभागृहाचे दरवाजे बंद करा, त्यासंदर्भातील नियमांची तरतूद आहे, ती तपासा असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. यामुळे जिल्हाधिकाºयांनी निवडणूक अधिनियमानुसार सभागृहातील कामकाज करण्यात येत आहे. सभागृहाचे दरवाजे बंद करण्याचे काम हे शिपायांचे असून ते बघतील असे पुन्हा एकदा शिवसेनेला सुनावले.

मी सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम केले. त्यानंतर पाचवेळा सातत्याने निवडून आले. प्रभागातील कामांमुळे जनता सतत माझ्याबरोबरच राहिली आणि आताही जनता आणि माझा पक्ष माझ्याबरोबरच असून, त्यांनी मला न्याय दिला. त्याबद्दल सर्व पक्षनेत्यांचे आणि नगरसेवकांचे आभारी आहे. सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी मोठे काम करण्याची संधी दिली आहे. आता शहराच्या विकासासाठी प्रयत्न करण्यावर भर देणार आहेत. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवितानाच शहर स्वच्छ राहावे यावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. त्यानंतर महापालिकेचे अन्य मोठे प्रकल्प मार्गी लावण्यावरदेखील भर दिला जाईल.
- सतीश कुलकर्णी,
नवनिर्वाचित महापौर
मी तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आली आहे. त्यामुळे नगरसेवकांशी असलेल्या प्रेमाच्या संबंधांमुळेच त्यांनी मला बिनविरोध निवडून देऊन प्रेमाचा परतावा दिला आहे. शहराच्या विकासासाठी मी माझ्या अनुभवाचा वापर करून कामकाज करेल. तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पक्षाने दिलेल्या संधीबद्दल आभारी आहे.
- भिकूबाई बागुल, नवनिर्वाचित उपमहापौर

Web Title:  BJP maintains municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.