नाशिक : महापालिकेने अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची सुरू केलेली कारवाई आजवर शहराच्या इतिहासात सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. शहराच्या कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अनधिकृत भंगार बाजारावरील कारवाईचे नाशिककरांनी स्वागत केले आहे. सर्व राजकीय दबाव झुगारून मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण व पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दाखविलेल्या धैर्यालाही नाशिककरांनी दाद दिली आहे.
महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई नेहमीच केली जात असते. परंतु, शनिवारी (दि.७) अनधिकृत भंगार बाजार विरोधी सुरू केलेली कारवाई महापालिकेच्या आणि शहराच्याही आजवरच्या इतिहासात सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. यापूर्वी, महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत पंचवटीतील जलसंपदा विभागाच्या जागेवर अनधिकृतपणे वसलेल्या दुर्गानगरमधील ४३ बंगल्यांवर बुलडोझर चालविण्यात आला होता. त्यानंतर १९९९ मध्ये के. पी. बक्षी आयुक्त असताना शहरातील मध्यवस्तीत असलेल्या पक्क्या बांधकामांवर हातोडा चालविण्यात आला होता. रस्ता रुंदीकरणासाठी मुंबई नाका, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, गंगापूररोड परिसरातील बांधकामे हटविण्यात आली होती. या मोहिमेमुळे के. पी. बक्षी यांचा दबदबा वाढला होता. त्यानंतर, भंगार बाजारविरोधी सुरू करण्यात आलेली कारवाई ही आजवरची सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. १९९० पासून अंबड-लिंकरोडवर अतिशय मोजक्या संख्येने वसलेल्या भंगार बाजाराने नंतर उग्र स्वरूप धारण केले. रहिवासी वापरासाठी असलेल्या जागेचा अनधिकृतपणे व्यवसायासाठी वापर सुरू असल्याने आणि भंगार बाजारात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालत असल्याच्या तक्रारी असल्याने सदर बाजार हटविण्यासाठी परिसरातील नागरिकांचा रेटा वाढला होता. परंतु, व्यावसायिकांनी न्यायालयात सदर प्रश्न नेल्याने दीर्घकाळापासून कारवाईचा प्रश्न प्रलंबित राहिला होता.
परंतु, उच्च व सर्वोच्च न्यायालयाने व्यावसायिकांचे सर्व दावे फेटाळून लावल्याने महापालिकेचा कारवाईचा मार्ग मोकळा झाला. महापालिकेत गेल्या वीस वर्षांत अनेक आयुक्त आले, महापौर आले परंतु भंगार बाजाराचा प्रश्न सोडविण्यास फारसे कुणी स्वारस्य दाखविले नाही. उलट वीस वर्षांत भंगार बाजाराचा विस्तार वाढत गेला. दरम्यान, आधी आयुक्त गेडाम यांनी डिमार्केशनवर भर देत कारवाईची तयारी केली, परंतु पोलीस बंदोबस्ताचे कारण दर्शवित कारवाईला मुहूर्त लाभला नाही. मात्र, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, कारवाईला मूर्तस्वरूप देण्याची इच्छाशक्ती दाखविली, त्यांना पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी साथ दिली आणि आजवरच्या सर्वांत मोठी कारवाईची इतिहासात नोंद झाली. (प्रतिनिधी)
आजवरची सर्वांत मोठी कारवाई
By admin | Updated: January 8, 2017 01:28 IST
इतिहासात नोंद : महापालिकेची धडक मोहीम; नाशिककरांकडून कारवाईचे स्वागत
आजवरची सर्वांत मोठी कारवाई
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}