नाशिक : बांगलादेशी नागरिकांसह रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखल्यांचे वितरण केल्याच्या आरोपप्रकरणी मालेगावी विशेष तपास पथक (एसआयटी) तीन दिवसांपासून चौकशीसाठी तळ ठोकून असतानाच गुरुवारी राज्य सरकारने मालेगावचे तत्कालीन तहसीलदार व सध्या जळगाव जिल्ह्यातील बोदवडचे तहसीलदार म्हणून कार्यरत नितीनकुमार देवरे यांच्यासह मालेगावचे नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे.
मालेगाव तहसील कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांनादेखील जिल्हाधिकारी कार्यालयाने निलंबित केले आहे. गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी मालेगाव दौऱ्यावर येत असतानाच पूर्वसंध्येला राज्य सरकारने कारवाई करत दणका दिला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक्स अकाउंटवरून माहिती देतानाच या कारवाईचे स्वागत केले आहे. मालेगाव शहर व तालुक्यातून बांगलादेशी नागरिकांसह रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रांचे वाटप केले जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यांना कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी परवानगीही मिळाली होती.
राज्य सरकारने तत्कालीन तहसीलदारासह विद्यमान नायब तहसीलदारावर निलंबनाची कारवाई केली असतानाच नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने मालेगाव तहसील कार्यालयातील लिपिक विजय अंभोरे, रेहान शेख तसेच अव्वल कारकून भरत शेवाळे यांना देखील निलंबित केले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह हे शुक्रवारी मालेगाव दौऱ्यावर येत असून, अजंग येथे त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शाह यांच्याकडून या प्रकरणाचा उल्लेख होण्याची शक्यता असतानाच राज्य सरकारने त्यापूर्वीच निलंबनाची कारवाई करत दणका दिला आहे.
राज्यभरात एक लाखाहून अधिक प्रमाणपत्रांचे वाटप?
सोमय्या यांनी राज्यभरात एक लाखाहून अधिक लोकांना अशाप्रकारे जन्म प्रमाणपत्रांचे वाटप केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी २० जिल्ह्यांतून संकलित केलेल्या माहितीनुसार ही संख्या ६३ हजार इतकी असून, ४२ हजार लोकांचे अर्ज मान्य होऊन त्यांनाही जन्म दाखले दिले जाणार असल्याचा दावा केला आहे. मालेगावप्रमाणेच सिल्लोड, अंजनगाव सुर्जी, अमरावती, चांदूर रेल्वे, अचलपूर येथेही अशाप्रकारे दाखल्यांचे वाटप केले गेल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वीच प्रक्रिया थांबवण्याचे आदेश
सोमय्या यांनी या कारवाईचे स्वागत करताना मालेगाव शहरातून ३९७७ जन्म प्रमाणपत्र हे बनावट कागदपत्रांच्या आधारे दिले गेल्याचे त्यांच्या एक्स अकाउंटवर म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वीच सोमय्या यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र देत चौकशी होईपर्यंत जन्म दाखले वितरित करण्याची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने तातडीने आदेश काढत सदर प्रक्रिया थांबविली होती. तर गेल्या तीन दिवसांपासून एसआयटीचे पथक मालेगावमध्ये तळ ठोकून चौकशी करत आहे.
निलंबन काळात देवरेंचे मुख्यालय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय
सोमय्या यांनी मालेगावी येऊन कागदपत्रांची तपासणी करतानाच छावणी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत एसआयटीची स्थापना केली होती. त्यानुसार, पथक मालेगावी तळ ठोकून असून, ज्यांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्यांच्या घरी जाऊन कागदपत्रांची पडताळणी करत असतानाच महसूल विभागाने गुरुवारी मालेगावचे तत्कालीन तहसीलदार व सध्या बोदवड येथे कार्यरत असलेले तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यासह सध्याचे नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून, या दोघांची विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. या निलंबन काळात देवरे यांचे मुख्यालय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय तर धारणकर यांचे मुख्यालय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय ठेवण्यात आले आहे. या कारवाईचे किरीट सोमय्या यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून स्वागत केले आहे.