नॅबच्या विद्यार्थी वसतिगृहाचा बुधवारी भूमिपूजन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:46+5:302021-02-05T05:45:46+5:30
नाशिक : अंध बांधवांसह दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, संशोधन तसेच विशेष शिक्षणासंदर्भात अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्याकरिता कार्यशाळा घेण्यासाठी ...

नॅबच्या विद्यार्थी वसतिगृहाचा बुधवारी भूमिपूजन सोहळा
नाशिक : अंध बांधवांसह दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, संशोधन तसेच विशेष शिक्षणासंदर्भात अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्याकरिता कार्यशाळा घेण्यासाठी निवासी व्यवस्था व्हावी, यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड संस्थेच्या नाशिक शाखेच्यावतीने नॅब महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण विद्यार्थी वसतिगृहाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते बुधवारी (दि. ३) होणार आहे.
सातपूरला नॅबच्या जागेत या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजता होणार असल्याची माहिती नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर व नॅब नाशिकचे चेअरमन व सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजेंद्र कलाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अधिक माहिती देताना कलंत्री म्हणाले की, ६० मुलींच्या निवासाची व्यवस्था या वास्तूमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात नॅब महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष व विश्वस्त तसेच उद्योगपती देवकिसनजी सारडा यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या वसतिगृहाच्या उभारणीसाठी ३ कोटी रुपये खर्च येणार असून, त्यामध्ये उच्चशिक्षण घेणारे विद्यार्थी, विषयतज्ज्ञ व्याख्याते, प्रशिक्षणार्थींना अद्ययावत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सूर्यभान साळुंके, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री, विनोद जाजू, राजेंद्र कलाल व श्याम पाडेकर उपस्थित होते.