भरतनाट्यमने जिंकली मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:43 IST2018-07-10T00:43:41+5:302018-07-10T00:43:56+5:30
भरतनाट्यम नृत्यात शिष्य पारंगत झाला त्याचा आनंदोत्सव म्हणजे ‘अरेंगेत्रम’द्वारे होणारा रंगप्रवेश. नृत्यांगना प्रीतिका पाथरे हिच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने रसिक भारावले. अलारिपू, जतिस्वरम, सारसमुखीसारख्या नृत्यप्रकारांनी मने जिंकली.

भरतनाट्यमने जिंकली मने
नाशिक : भरतनाट्यम नृत्यात शिष्य पारंगत झाला त्याचा आनंदोत्सव म्हणजे ‘अरेंगेत्रम’द्वारे होणारा रंगप्रवेश. नृत्यांगना प्रीतिका पाथरे हिच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने रसिक भारावले. अलारिपू, जतिस्वरम, सारसमुखीसारख्या नृत्यप्रकारांनी मने जिंकली. भरतनाट्यमच्या शिक्षिका मीरा गणपती धानू यांच्या शिष्य प्रीतिकाचा अरेंगेत्रम रावसाहेब थोरात सभागृहात उत्साहात पार पडला. मागील अकरा वर्षांपासून भरतनाट्यमचे धडे गिरविणाऱ्या नृत्यांगना प्रीतिकाने आपले एकापेक्षा एक सरस नृत्यप्रकार मंचावर सादर करत उपस्थितांच्या मनाला मोहिनी घातली. अलारिपू नृत्यप्रकाराने भरतनाट्यमच्या नृत्याविष्काराला खरा प्रारंभ झाला. त्यानंतर प्रीतिकाने खास शैलीत जथिस्वरम् हा भरतनाट्यमचा नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. वर्णाम, तिल्लाना, मंगलम्, देवी पदम्, नटराज पदम्, माझे माहेर पंढरी अशा एकापेक्षा एक सरस भरतनाट्यमच्या नृत्यप्रकारांनी डोळ्यांची पारणे फेडली. ‘वर्णम’मधून माखन चोर कृष्ण कालिया नर्तन आणि सुदामा प्रीती सहज सुंदरचा अभिनय लिलयापणे साकारला. ‘माझे माहेर पंढरी’ या नृत्यप्रकारातून उपस्थितांनी जणू वारीचा आनंद लुटला.