अत्युच्च दर्जाच्या काळ्या काचांआड खरातचे सुरू होते काळे कारनामे; चौकशी सुरू असताना बोलती बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 07:43 IST2026-03-29T07:43:56+5:302026-03-29T07:43:56+5:30
पीडित महिलेदेखत स्पॉट पंचनामा, सीन रीक्रिएशन

अत्युच्च दर्जाच्या काळ्या काचांआड खरातचे सुरू होते काळे कारनामे; चौकशी सुरू असताना बोलती बंद
नाशिक : भोंदू बाबा अशोक खरातच्या विरोधात भक्कम पुरावे न्यायालयात सादर करता यावे यासाठी एसआयटी पथकाने तब्बल दहा गुन्हे दाखल झाल्यानंतर शनिवारी खरातची पुन्हा पाच तास कोठडीत कसून चौकशी केली. त्याअगोदर भलत्या सकाळी त्याच्या कॅनडा कॉर्नरवरील ओकस प्रापर्टी कार्यालयात एसआयटी पथकाने सलग तिसऱ्या दिवशी ऑन कॅमेरा स्पॉट पंचनामा व फिर्यादी महिलेदेखत गुन्हा कसा घडला याची माहिती घेतली. ४० मिनिटे ही तपासणी सुरू होती.'
गुन्ह्याचे वैज्ञानिक पद्धतीने केले सूक्ष्म विश्लेषण
खरातच्या केबिन बाहेर एकावेळेस किती लोक थांबू शकत होते, एक जण आत गेल्यावर दुसऱ्याचा नंबर किती वेळाने लागत होता, महिला किंवा पुरुष केबिनमध्ये आल्यावर खरात प्रथम काय करत होता याची सर्व माहिती पथकाने स्पॉट पंचनाम्याद्वारे पीडित महिलेकडून घेतली.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि आरोपीने सांगितलेली माहिती जुळते की नाही? याचा तपास एसआटी पथकाने केला. गुन्ह्याचे वैज्ञानिक पद्धतीने सूक्ष्म विश्लेषण करण्याचा प्रयत्नही पथकाने केला.
कोठडीत चौकशी सुरु असताना त्याची बोलती बंद झाली होती. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्यासमोर चौकशी दरम्यान तो मान खाली घालून उभा असल्याचे समजते.
केबिनच्या काळा काचा पाहून तपास पथक थक्क
बाहेरून केबिनच्या आतले दृश्य दिसू नये याची भोंदू खरातने पुरेपूर काळजी घेतली होती. केबिनसह कार्यालयाची प्रत्येक काच अतिगडद काळ्या रंगाची बसविली आहे. अशा प्रकारे नेपथ्य रचना करून खरातने अनेक महिलांवर लैगिंक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. अति उच्च दर्जाच्या या काळ्याकुट्ट काचांचा दर्जा पाहून तपास पथकही थक्क झाले. कितीही प्रयत्न केला तरी बाहेरून आतमधले काडीमात्र दिसत नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मलिकला क्लीन चिट, नंतर मुलाला काम ?
'मी टू' प्रकरणात गायक-संगीतकार अनु मलिक यांना दिलेल्या क्लीन चिटबाबत हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित करत उद्धवसेनेने माजी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप केले आहेत. चाकणकर यांच्या कार्यकाळात अनु मलिक यांच्याविरोधातील लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी झाली आणि त्यांना क्लीन चिट देण्यात आली. त्यानंतर चाकणकर यांच्या मुलाला मलिक यांच्या निर्मितीतील चित्रपटात काम मिळाल्याचा दावा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला.