सावधान ! हजारापार रुग्णसंख्येवर वेळीच नियंत्रण आणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:03+5:302021-09-25T04:14:03+5:30
नाशिक : हजाराच्या आत असलेली रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत असल्याने गंभीरतेने विचार करावा लागणार आहे. ...

सावधान ! हजारापार रुग्णसंख्येवर वेळीच नियंत्रण आणा
नाशिक : हजाराच्या आत असलेली रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येत असल्याने गंभीरतेने विचार करावा लागणार आहे. या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्याकरिता जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, दिवसाला एक लाख लसीकरण होण्याच्या दृष्टीने लसींची मागणी करून त्यानुसार नियोजन करण्यात यावे अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र दराडे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, सुहास कांदे, नितीन पवार, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील ऑक्सिजन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्यादेखील त्यांनी सूचना दिल्या. ज्या ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत, त्याठिकाणी विजेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर बसविण्यात यावेत. यासोबतच जेथे ऑक्सिजननिर्मीती प्रकल्प तयार आहेत, त्या प्रकल्पांचे आमदारांनी उद्घाटन करुन प्रकल्पांचे लोकार्पण करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनीदेखील कोरोनाच्या नियमांचे पालन करून रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेला १४व्या वित्त आयोगाच्या व्याजातून ३५ रुग्णवाहिकांना मंजूर करण्यात आल्या आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण भागातील अंतर लक्षात घेता तेथे मागणीनुसार रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. कालबाह्य झालेल्या रुग्णवाहिका बदलून नव्या रुग्णवाहिका मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचेदेखील त्यांनी सुचविले.
240921\24nsk_32_24092021_13.jpg
छगन भुजबळ