ब्राम्हणवाडेत खंडेराव भक्तांनी ओढल्या बारा गाड्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:16 IST2018-12-14T17:15:04+5:302018-12-14T17:16:09+5:30
‘येळकोट.. येळकोट जय मल्हार’ खंडेराव महाराज की जय असा जयघोष करीत व भंडारा-खोबऱ्याची उधळण करीत सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे बारा गाड्या ओढत यात्रोत्सव मोठया उत्साहात पार पडला.

ब्राम्हणवाडेत खंडेराव भक्तांनी ओढल्या बारा गाड्या !
चंपाषष्ठी निमित्ताने सायंकाळी पाच वाजता सरपंच मंगला घुगे व उपसरपंच सुनील गिते यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून मिरवणूकीला सुरुवात झाली. संभळ - पिपाणीच्या निनादात देवांच्या काठीची मिरवणूकीला सुरूवात झाली. सुमारे दोन तासांच्या मिरवणूकीत काठ्या नाचविण्यासाठी ग्रामस्थांमध्ये चढाओढ बघायला मिळत होती. मिरवणूकीत सहभागी खंडोबा भक्तांबरोबर संपूर्ण आसमंत पिवळ्या भंडा-यात न्हाऊन निघाला होता. मिरवणूक खंडेराव महाराजांच्या मंदिराजवळ येताच खंडोबाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. पुजारी संदीप गिते, अनिल गिते, संजय गिते यांनी मानाच्या बारागाड्या ओढल्या. यावेळी परिसरात गाड्यांच्या व अश्वाच्या पायाखालचा भंडारा व दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, यात्रेनिमित्ताने भिका भिमा सांगवीकर यांच्या लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. अबालवृध्दांसह बालगोपाळांनी यात्रेत खेळणी, खाऊ खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. रात्री बसस्थानक परिसरात फटाक्यांची आतषबाजी बघण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.