"तुमचे १०० बाप आले तरी..."; गरजला बाळासाहेबांचा 'एआय' आवाज; भारावले शिवसैनिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:00 IST2025-04-17T11:50:34+5:302025-04-17T12:00:31+5:30

हुबेहूब बाळासाहेबांचा आवाज, बोलण्याची लकब आणि नाशिकमधील नेत्यांना थेट नावानिशी घालण्यात आलेली साद यामुळे शिवसैनिकांना बाळासाहेबच आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास होत होता.

Balasaheb thackeray ai speech in nashik shiv sena party workers reaction | "तुमचे १०० बाप आले तरी..."; गरजला बाळासाहेबांचा 'एआय' आवाज; भारावले शिवसैनिक!

"तुमचे १०० बाप आले तरी..."; गरजला बाळासाहेबांचा 'एआय' आवाज; भारावले शिवसैनिक!

Balasaheb Thackeray AI Speech : माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो असा बाळासाहेब ठाकरे यांचा गंभीर आवाज २१ वर्षांनंतर पुन्हा एकदा नाशिकच्या वातावरणात घुमला आणि उपस्थित शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत सभागृह डोक्यावर घेतले. सद्यस्थितीवर भाष्य करत शिवसेना संपवण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी ती संपणार नाही. तुमचे शंभर बाप झाली आले तरी शिवसेना संपणार नाही, असे दरडावून सांगणारा बाळासाहेबांचा आवाज घुमला अन् २००४ सालच्या लोकसभा निवडणुकांसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेची आठवण नाशिककरांच्या मनात ताजी झाली. 

नाशिक येथे बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या झालेल्या जिल्हा शिबिर मेळाव्यात एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण दाखवण्यात आले. एका बाजूला पडद्यावर दाखवली जाणारी बाळासाहेबांच्या सभेची दृष्ये आणि बाळासाहेबांच्या पुतळ्याशेजारील स्पीकरमधून येणारा हुबेहूब बाळासाहेबांचा आवाज, बोलण्याची लकब आणि नाशिकमधील नेत्यांना थेट नावानिशी घालण्यात आलेली साद यामुळे शिवसैनिकांना बाळासाहेबच आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास होत होता.

"नाशिक म्हटले की गर्दी होणारच... नाशिकचे आणि आमचे नाते वेगळे आहे. त्यात ढोंगीपणा नाही. महाराष्ट्रात आमच्यामुळे वाढले आणि आमच्याच पाठीत घाव घातले. माजी मंत्री बबन घोलप यांना उद्देशून बबन घोलप आले आहे का? आता जाऊ नको. कान्हेरे मैदान भरले आहे. जगदंबेची कृपा आहे आणि ती राहणारच," असाही उल्लेख या भाषणात करण्यात आला.

"मी तुमच्या सोबत आहे..."

"आपली शिवसेना व्यापाऱ्यांनी तोडली. संभाजी महाराजांसारखेच स्वकियांचे वार आपल्या नशिबात आले. परंतु घाबरू नका. गद्दारांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. मुंबई आपलीच आहे. अशा आव्हानांमधूनच शिवसैनिक पुढे जाईल, मी अजूनही तुमच्या सोबतच आहे. जय हिंद... जय महाराष्ट्र!" अशा घोषणेने संवादाचा शेवट झाला आणि शिवसैनिकांनी सभागृह डोक्यावर घेतले.

Web Title: Balasaheb thackeray ai speech in nashik shiv sena party workers reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.