Balasaheb Sanap preparing for return home? | बाळासाहेब सानप स्वगृही परतण्याच्या तयारीत?

बाळासाहेब सानप स्वगृही परतण्याच्या तयारीत?

नाशिक : विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्टवादीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले व पराभूत होताच सेनेत प्रवेश केलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांना महापौर निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी प्रयत्न करूनही यश न मिळाल्याने ते पुन्हा स्वगृही परतण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपात असलेल्या सानप समर्थक नगरसेवकांनी महापौर निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे सतीश कुलकर्णी महापौर होऊ शकले आहेत, त्यामुळे आता लवकरच सानपदेखील पक्षात येतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे.
तीस वर्षांहून अधिक काळ भाजप व राष्टय स्वयंसेवक संघात काम केलेल्या बाळासाहेब सानप यांना पक्षाने वेळोवेळी महत्त्वाची पदेही दिली आहेत. महापौर, उपमहापौर, शहराध्यक्ष, आमदारकी अशा विविध चढ्या पदांवर काम करणाऱ्या सानप यांनी त्या त्या पदावर असताना पक्ष वाढीसाठी योगदानही दिले होते. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे नाराज सानप यांनी ऐनवेळी राष्टÑवादीकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढविली व त्याच वेळी पक्षाला ‘माझे काय चुकले?’ असा सवाल केला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. परंतु दोनच दिवसांत त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेनेचे शिवबंधन बांधले होते. ऐन महापौर निवडणुकीच्या तोंडावर सानप यांनी सेनेत प्रवेश केल्याने सेनेचे बळ वाढले. त्यातच सानप यांनी महापौरपद शिवसेनेकडे खेचून आणण्याचा मनसुबा रचून भाजपतील समर्थक नगरसेवकांना आपल्या कह्यात ठेवले होते. महापौर निवडणुकीत सानप यांची भूमिका सेनेसाठी महत्त्वाची ठरली असली तरी, त्याचा लाभ मात्र सेना उचलू शकली नाही. अन्य विरोधी पक्षांनीही सेनेला साथ देण्यास हात अखडता घेतल्यामुळे अखेरच्या क्षणी सानप यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांना पुन्हा भाजपच्या पाठीशी उभे केले. परिणामी सतीश कुलकर्णी यांचे पारडे जड होऊन ते बिनविरोध निवडून आले. महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता आल्यामुळे आता बाळासाहेब सानप पुन्हा पक्षात सक्रिय होतील अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेच सानप यांनी आपल्या समर्थकांना भाजपच्या पाठीशी उभे केल्याचा दावाही केला जात आहे.
भाजपने व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांना भ्रष्टाचारी संबोधून त्यांची गय केली जाणार नाही असा जाहीररीत्या इशारा दिल्यामुळे सानप भाजपात जातील काय व पक्षदेखील त्यांना स्वीकारेल काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Web Title:  Balasaheb Sanap preparing for return home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.