Azim suffers from depression | मनपाच्या उदासीनतेमुळे चिमुकल्या अजीमचा बळी
मनपाच्या उदासीनतेमुळे चिमुकल्या अजीमचा बळी

नाशिक : महापालिकेच्या भुयारी गटारीच्या उघड्या चेंबरबाबतीत अनेकदा ओरड केली जाते. मात्र जोपर्यंत अपघात घडत नाही तोपर्यंत असे चेंबर विभागाकडून बंदिस्त केले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वडाळागावातील सादिकनगर भागात अशाच एका चेंबरमध्ये पडून सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुकल्याच्या मृत्यूला नेमके कोण जबाबदार? असा प्रश्न येथील संतप्त रहिवाशांनी उपस्थित केला असून, अजीम हा लहानगा प्रशासकीय उदासीनतेचा बळी ठरल्याची भावना व्यक्त केली आहे.
भूमिगत गटारींच्या चेंबरमध्ये पडून मजुरापासून प्राण्यांपर्यंत मृत्यूच्या अनेकदा घटना घडल्या आहेत. याबाबत मनपा प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने या घटना अद्यापही थांबलेल्या नाहीत. महेबूबनगर, सादिकनगर, साठेनगर हा स्लम परिसर आहे. या भागात बहुतांश चेंबरवरील ढापे गायब झाले असून, चेंबर बंदिस्त करण्याची मागणी केली जाते, मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने अशाप्रकारच्या दुर्दैवी घटना घडत असल्याचे येथील रहिवासी लाला शहा, इरफान शेख, युनूस खान, फिरोज फारूखी, जबेर खान आदींनी सांगितले.
नुकसानभरपाईची मागणी
चिमुकल्या अजीमचा चेंबरच्या ढाप्यात पडून मृत्यू झाला. यास मनपाचा गलथान कारभार जबाबदार आहे. अजीमचे कुटुंब अत्यंत गरीब असून, वडील फळविक्रेता आहे. अजीम अभ्यासात हुशार असल्याने सादिकनगरमध्ये तो सर्वांचाच लाडका होता. त्याच्या अचानकपणे जाण्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. तसेच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या कुटुंबाला महापालिका प्रशासनाने नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
‘त्या’ दोघींचे प्रसंगावधान पण...
मनपाच्या उर्दू शाळेत इयत्ता दुसरीत शिकणारा अजीम जुबेर खान (७) हा चिमुकला साधारणत: आठवडाभरापूर्वी सादिकनगरमधील एका गल्लीत असलेल्या उघड्या चेंबरमध्ये पडला. यावेळी अजीम जोरात ओरडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सुरैया शेख, जकिया शेख या महिलांनी तत्काळ चेंबरच्या दिशेने धाव घेतली. दोघींनी क्षणाचाही विलंब न लावता अजीमला कसेबसे बाहेर काढले. तोपर्यंत स्थानिक नागरिकांची चेंबरभोवती मोठी गर्दी जमली होती. चिमुकल्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी (दि.२८) त्याची प्राणज्योत मालवली.

Web Title:  Azim suffers from depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.